कोयना धरणातील पाणीसाठ्याने नुकताच १०० टीएमसीचा टप्पा पार केला; दुष्काळाची चिंता आता दूर

राज्याच्या वीजनिर्मितीसह पूर्वेकडील दुष्काळी भागाच्या सिंचनाला दिलासा

by Team Satara Today | published on : 27 August 2026


सातारा : महाराष्ट्राच्या वीजनिर्मिती आणि सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणाने ऑगस्टच्या अखेरीस पाणीसाठ्याची शंभरी ओलांडली. धरणातील पाणीसाठ्याने नुकताच १०० टीएमसीचा टप्पा पार केला. जूनअखेर पाणीसाठा खालावल्याने निर्माण झालेली दुष्काळाची चिंता आता दूर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेच्या जवळ पोचल्याने राज्याच्या वीजनिर्मितीसह पूर्वेकडील दुष्काळी भागाच्या सिंचनाला दिलासा मिळाला आहे.

धरणातून आतापर्यंत पायथा वीजगृहातून ३.०९ टीएमसी, तर सहा वक्र दरवाजांतून २५.३५ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आतापर्यंत ५.५७ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या पश्चिमेकडील वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू आहे. पूर्वेकडील सिंचनासाठी मागणी नसल्याने त्या दिशेचा विसर्ग बंद केला आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्याचे एक जून ते ३० मे या जलवर्षानुसार नियोजन केले जाते. त्यानुसार धरणातील २९ टीएमसी पाणी पूर्वेकडील सिंचनासाठी, तर ६९ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरण्याचे नियोजन आहे.

यंदाच्या जलवर्षाची सुरुवात कोयनेसाठी चिंताजनक होती. जूनअखेर पाणीसाठा खालावल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने केवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परिणामी राज्याच्या वीजनिर्मिती आणि सिंचनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, पाच जुलैनंतर पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. ९ जुलैला धरणातील पाणीसाठ्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अवघ्या सात दिवसांत तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठ्याची विक्रमी वाढ झाली. जुलैमध्ये सातत्याने पाऊस झाल्याने जलाशयात आवक वाढली. त्यामुळे पाणी नदीपात्रात सोडले. त्यानंतर ३० जुलैला दरवाजे उघडून पहिला नदीपात्रात विसर्ग सुरू केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नेपाळमध्ये अडकलेल्या चार पर्यटकांशी संपर्क साधण्यात राज्य सरकारला यश, उर्वरित तीन पर्यटकांशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरू - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या