सातारा : जानकर कॉलनीतील नागरिकांना भेडसावणार्या पाणीप्रश्नावर अखेर तोडगा निघाला असून, कास पाणी योजनेचा पाणीपुरवठा या भागात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून अपुर्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची सुरू असलेली धावपळ आता थांबण्याची शक्यता आहे. नियोजन सभापती अशोक शेडगे यांच्या पुढाकारातून आणि माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्या पाठपुराव्यामुळे ही सुविधा प्रत्यक्षात आली.
जानकर कॉलनी परिसरातील अनेक कुटुंबांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागत होती. विशेषतः उन्हाळ्यात तसेच पाणीटंचाईच्या काळात हा प्रश्न अधिक गंभीर होत होता. त्यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे कास योजनेतून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत अशोक शेडगे यांनी कॉलनीला कासचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा करून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. अखेर कॉलनीतील नळांना कासचे पाणी सुरू झाल्याने नागरिकांच्या प्रमुख नागरी समस्येवर मार्ग निघाला आहे.
पाणीपुरवठा सुरू होताच नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नियमित पाणी उपलब्ध झाल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय कमी होणार आहे. यासाठी नागरिकांनी अशोक शेडगे आणि वसंत लेवे यांचे आभार मानले.
दरम्यान, पाणीपुरवठा सुरू करण्याबरोबरच भविष्यात कॉलनीतील पाणी वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
जानकर कॉलनीत अखेर कासचे पाणी; वर्षानुवर्षांच्या पाणीटंचाईला मिळाला दिलासा; अशोक शेडगे, वसंत लेवे यांच्या पाठपुराव्याला यश
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा