सातारा जिल्ह्यात बाप्पांचे वाजत गाजत आगमन

चैतन्य सोहळ्याची दिमाखदार सुरवात; पोलीस यंत्रणा सज्ज

by Team Satara Today | published on : 07 September 2024


सातारा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा खणखणीत सुरात सातारा जिल्ह्यात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. ढोल ताशांचा गजर, वातावरणात भरलेला अखंड उत्साह आणि घरोघरी बाप्पांच्या आगमनाची आतुरता असे भक्तीमय वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आढळून आले. यापुढील दहा दिवस हा चैतन्य सोहळा असाच भक्तिमय परंपरेमध्ये सुरू राहणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या घरीही बाप्पांचे थाटात आणि वाजत गाजत आगमन झाले.
सातारा शहरांमध्ये ठिकठिकाणी गर्दीचा महापूर आढळून आला. बाजारपेठेमध्ये नारळ, हार, फुले, दुर्वा, केवडा, कमळ, तसेच पूजेचे साहित्य यांची चढ्या भावाने विक्री झाली. सातारा शहरातील चौका-चौकांमध्ये गणपती बाप्पा मोरया, असे चैतन्यमयी सूर ऐकू येत होते. सातारा शहरातील राजवाडा परिसरात फळे, फुले, पत्री, विविध प्रकारचे मोदक खरेदीसाठी सातारकरांची झुंबड उडाली होती. राजवाडा परिसरातील फ्रुट स्टॉल्सवर देश-विदेशातील उत्कृष्ट प्रतीची फळे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. बाप्पाला आवडणार्‍या माव्याच्या मोदकांसोबत स्ट्रॉबेरी, गुलकंद, पिस्ता, काजू, बटरस्कॉच तसेच विविध प्रकारचे साच्यात घातलेले मोदकही विक्रीसाठी उपलब्ध आहेेत. शेवंती, गुलाब, निशिगंध, चाफा, झेंडू, बेंगलोरी गुलाब आदी प्रकारच्या फुलांनाही मोठी मागणी होती. पूजा साहित्यामध्ये केशर, अष्टगंध, हळद-कुंकू, जान्हवे, उदबत्ती, अत्तर, निरंजन, वाती खरेदीसाठी मोठी गर्दी झाली.
अनेक गणेश भक्तांनी अधून मधून बरसणार्‍या रिमझिम सरीत आपल्या बाप्पांचे आगमन एक दिवस आधी केले होते. घरातील छोट्या बालकांसमवेत अगदी दुचाकीवरूनही गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी पोहोचत होते. त्याची उत्सुकता सर्वत्र दिसून येत होती. गणेश मंडळांच्या सातारा शहरातून देखण्या मिरवणुका काढण्यात आल्या. काही मंडळांनी डॉल्बीला फाटा देऊन ढोल ताशाच्या गजरामध्ये गणरायाचे उत्साहात स्वागत केले. सातारा शहरातील शंकर-पार्वती, सोमवार पेठेतील आझाद गणेशोत्सव मंडळ, मोती चौकातील प्रतापसिंह महाराज मित्र मंडळ, सम्राट गणेश, मंडईचा राजा या मंडळांनी आपल्या गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना केली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रतिष्ठापना सोहळ्यांचे मंगलमय सूर ऐकू येत होते. 
दीड दिवसाच्या गणपतीसाठी विसर्जन तलावावर तसेच भवानी तलाव (पालिका जलतरण तलाव) येथे व सातारा शहरात पाच ठिकाणी दगडीकुंडांची सोय करण्यात आलेली आहे. त्याची पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत पाहणी केली आहे. सातारा नगरपालिकेच्या मानाच्या गणपतीची प्रतिष्ठापना येथील नगरपालिकेच्या जुन्या कार्यालयामध्ये करण्यात आली आहे. 
तसेच पुढील तीन दिवसांमध्ये जेष्ठा गौरीचे आगमन होत असून या आगमनाच्या प्रित्यर्थ सुवासिनींनी तिचा फराळ आणि गौरीचे दागिने सजावटीसाठी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. सातारा पोलिसांनी पहिल्या दिवशी गर्दीचे नियमन करण्यासाठी ठिकठिकाणी विशेषत: मोती चौक, पोवई नाका, हुतात्मा चौक, राधिका चौक, समर्थ मंदिर चौक येथे बंदोबस्त तैनात केला होता.
सातारा जिल्ह्याची कमान सांभाळणारे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या निवासस्थानी गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. पालकमंत्री देसाई यांच्या कोयना दौलत या निवासस्थानी पालखीतून बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. या पालखीला स्वतः शंभूराज यांनी खांदा देत बाप्पांचे थाटात आगमन केले. कामाच्या व्यस्त तेतही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी बाप्पांची प्रतिष्ठापना करत गणपती बाप्पा मोरया चा गजर केला व समस्त सातारकरांना गणपतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
पुढील दहा दिवस गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आठ उपविभागीय अधिकारी, वीस पोलीस निरीक्षक, 103 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, 1700 पोलीस कर्मचारी तसेच साडेसातशे जवानांचा स्ट्रायकिंग फोर्स आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्ताच्या दृष्टीने तैनात करण्यात आली आहे. या बंदोबस्ताचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आढावा घेतला असून पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा शहराच्या हद्दीतील सातारा शहर व शाहूपुरी तसेच इतर पोलीस चौकींना ध्वनी मापन करण्यासाठी डेसिबल यंत्रणा देण्यात आली असून सर्व गणेशोत्सव मंडळांच्या डॉल्बी चे शास्त्रीय मोजमाप होणार आहे. 45 डेसिबल पेक्षा अधिक ध्वनी यंत्रणा वाजवणार्‍या मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सिंह रथातून दिमाखदार मिरवणूक
पुढील बातमी
डॉ. आंबेडकरांना पाहिलेल्या रुक्मिणीबाई काळाच्या पडद्याआड

संबंधित बातम्या