शरद पवार गटाचे खंडणीप्रकरणी अजित पवार पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 08 April 2025


दहिवडी : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या खंडणीच्या तक्रारी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अजित पवारांना दहिवडी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांचे खंदे समर्थक असलेल्या अजित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खंडणी प्रकरणात तुषार खरात यांना दहिवडी पोलिसांनी मुंबईमधून ताब्यात घेतले होते. ज्या महिलेच्या अनुषंगाने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केले गेले, त्या महिलेलादेखील सातारा पोलिसांनी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले होते. 

यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अनिल सुभेदार यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडून या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे म्हटले होते.

खंडणी प्रकरणात दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतलेले अजित पवार हे दहिवडी कॉलेज दहिवडीच्या महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य आहेत. पाणी फाउंडेशनमध्ये देखील अजित पवार यांनी चांगले काम केले आहे. दहिवडी पोलिसांनी खंडणी प्रकरणातील संशयितांच्या संभाषणाच्या कॉल डिटेल्स प्रणालीद्वारे या प्रकरणात सहभागी असलेल्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. याच प्रकरणाच्या अनुषंगाने अजित पवार यांच्याबाबत असलेल्या संशयावरून दहिवडी पोलिसांनी सोमवारी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. फोन कॉलच्या घटना क्रमावरुन त्यांचा खंडणी प्रकरणाशी संबंध असल्याचे गृहीत धरून त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सपोनि अक्षय सोनवणे यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दगडापासून वाळू योजनेला आता उद्योगाचा दर्जा
पुढील बातमी
शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घेण्याचे आवाहन

संबंधित बातम्या