पहलगाम : भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला करुन निष्पापांचा बळी घेणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. जवळपास तीन महिन्यांनी भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून, यामागे असणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने या तीन संशयित दहशतवाद्यांना ठार केलं.
भारतीय लष्कराला श्रीनगरमधील महादेव पर्वताजवळील लिडवासच्या सामान्य भागात तीन परदेशी दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी 'ऑपरेशन महादेव' नावाची संयुक्त कारवाई सुरू केली. थोड्या वेळासाठी झालेल्या गोळीबारानंतर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दहशतवाद्यांना ठार केलं.
सूत्रांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी दाचीगामच्या जंगलात लष्कराला एक संशयास्पद संपर्क आढळला होता, त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. स्थानिक खबऱ्यांनीही या माहितीला दुजोरा दिला आणि दहशतवाद्यांबद्दल माहिती दिली.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बाइसरन खोऱ्यात पाच दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांवर हल्ला केला होता. हे दहशतवादी द रेजिस्टेंस फ्रंटशी (TRF) जोडलेले होते. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयब्बाचा ते मोहरा असल्याचं मानलं जातं. हल्ल्यात दहशतवाद्यांनी M4 कार्बाइन आणि AK-47 चा वापर केला होता.
दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य केलं होतं. ज्या लोकांना इस्लाममधील आयत वाचता आला नाहीत, त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेनंतर संपूर्ण देशात रोष पसरला होता. याचा परिणाम पर्यटनावरही झाला होता.
नुकसान: एका नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू.
आरोप: भारताने हल्ल्यासाठी टीआरएफ आणि पाकिस्तानला जबाबदार धरले, तर पाकिस्तानने त्याला "घरगुती बंडखोरी" म्हटले.
प्रतिक्रिया: यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केला आणि पाकिस्तानी नागरिकांना हाकलून लावले.
पहलगाम हल्ल्यानंतर, 7 मे 2025 रोजी, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले. पण दहशतवाद्यांची मुळे उखडून टाकण्यासाठी सैन्याने एक दीर्घ रणनीती आखली, ज्याला ऑपरेशन महादेव असे नाव देण्यात आले. हे ऑपरेशन 96 दिवस चालले आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडणे किंवा मारणे हे त्याचे उद्दिष्ट होते.