सातारा : जनता सहकारी बँकेने प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत चांगले यश मिळवले आहे. बँकेच्या इतिहासात प्रथमच शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळवले आहे. नुकतेच रिझर्व्ह बँकेने जनता बँकेवरील सर्व निर्बंध शिथिल केले असून विनातारण कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. बँकेच्या या कामागिरीबाबत सभासदांमध्ये समाधान असल्याचे मत भागधारक पॅनेलचे पॅनेलप्रमुख, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हयाची अर्थवाहिनी व सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँकेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवीन कला व वाणिज्य महाविद्यालयात शनिवार दि. २६ रोजी चेअरमन अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. या सभेस बँकेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीस अहवाल सालात दिवंगत झालेले भारतातील नागरीक, शहिद जवान, बँकेचे सभासद, खातेदार, पदाधिकारी, कर्मचारी व त्यांचे नातेवाईक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बँकेचे जेष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक करुन सभेपुढील सर्व विषयांचे वाचन केले. यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांकडून एकमताने मंजुरी देण्यात आली. अहवाल सालात बँकेने रिझर्व्ह बँक, सहकार खाते व विविध नियामक संस्था यांच्याकडून वेळोवळी प्राप्त झालेले निर्देश, सूचनांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करून, योग्य नियोजन व आर्थिक शिस्तीचे कठोर पालन करून, कामकाज केल्याने बँकेकडील नेट एनपीएचे प्रमाण पहिल्यांदाच शून्य टक्के राखण्यात यश आले आहे. रिझर्व्ह बँकेने लागू केलेले सर्व निर्बंध शिथिल केले. बँकेला मिळालेल्या या यशाबद्दल संचालक मंडळ व सेवकांच्या अभिनंदनाचा ठराव जेष्ठ सभासद वसंतराव माळी, तात्यासाहेब कांबळे, सुजीत शेख यांनी सभासदांच्यावतीने मांडले. याप्रसंगी बँकेच्या संचालक मंडळाचा प्रतिनिधीक स्वरूपात सत्कार करताना सुजीत शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांना सप्रेम भेट दिली.
बँक आर्थिक अडचणीचा सामना करत असताना बँकेस सक्षम नेतृत्वाची गरज होती ते विनोद कुलकर्णी यांच्या रूपाने बँकेस मिळाले. श्री. कुलकर्णी यांनी बँकेच्या सर्व सभासद, संचालक, सेवक वर्ग यांना विश्वासात घेवून, ठेवीदारांच्या हितास प्राधान्य देवून बँकेत आर्थिक शिस्त आणून, कामकाजाचे योग्य नियोजन करून सातारकरांची एकमेव हक्काची बँक नुसती वाचवली नाही तर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांप्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील केली. श्री. कुलकर्णी यांच्या या आर्थिक संस्था वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित म्हणून त्यांची प्रथम साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या दोन सर्वोच्च संस्थांमध्ये कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला मिळवून देण्यात देखील श्री. कुलकर्णी यांचा मोलाचा वाटा असल्याने सुजीत शेख यांनी त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देवून बँकेच्या सभासदांच्यावतीने यथोचित सत्कार केला.
बँकेच्या जेष्ठ सभासद सौ. विमल रंगराव जाधव यांनी संचालक मंडळ सभेच्या भत्त्याबाबत बँकेस लेखी स्वरूपात प्रश्न विचारला होता. त्यास जेष्ठ संचालक जयेंद्र चव्हाण यांनी उत्तर देताना, बँकेच्या सर्व संचालकांनी बँकेच्या तत्कालीन आर्थिक परिस्थीतीचा विचार करून जून २०११ मध्ये झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये स्वत:हून संचालक मंडळ सभेचा भत्ता न घेण्याचा ठराव एकमताने संमत केला असून, आज रोजी बँक सुस्थितीत, मजबूत आर्थिक परिस्थतीत असताना देखील अद्याप भत्ता घेत नसल्याची माहिती दिली. तसेच सुजीत शेख यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बँकेच्या वतीने जयेंद्र चव्हाण यांनी दिली.
बँकेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब गोसावी यांनी वार्षिक सभेस उपस्थित सभासदांचे, बँकेस वेळोवेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सर्व सभासदांना वेळेत अहवाल पोहचविल्याबाबत भारतीय डाक विभागाचे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सभेस जागा व आवश्यक सामग्री, साहित्य उपलब्ध करून दिल्याबाबत कला व वाणिज्य महाविद्यालय व्यवस्थापनाचे बँकेच्यावतीने आभार मानले.
या सभेस बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, व्हा. चेअरमन विजय बडेकर, जेष्ठ संचालक जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, माधव सारडा, अशोक मोने, चंद्रशेखर घोडके, अविनाश बाचल, रविंद्र माने, वसंत लेवे, वजीर नदाफ, नारायण लोहार, बाळासाहेब गोसावी, ॲड.चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी, मच्छद्रिं जगदाळे, जेष्ठ संचालिका डॉ. चेतना माजगांवकर, सौ. सुजाता राजेमहाडिक, तज्ज्ञ संचालक चार्टर्ड अकौंटंट सौरभ रायरीकर, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य कर सल्लागार श्री.विनय नागर, ॲड. श्रुती कदम, सेवक संचालक निळकंठ सुर्ले, शिवाजी भोसले, सातारा शहरातील प्रथितयश जेष्ठ कर सल्लागार चंद्रकांत शहा, चार्टर्ड अकौंटंट भूषण शहा उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार, प्रशासन अधिकारी महेंद्र पुराणिक, बँकेतील सर्व अधिकारी व सेवक वर्ग यांनी वार्षिक सभेचे यशस्वीरित्या आयोजन केले.