सातारा : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे व पर्यावरणाच्या समतोलासाठी शेताचे बांध, माळरान, पडीक जमिनीवर शेतकऱ्यांनी बांबूची लागवड करण्यासाठी ग्रामपंचायत विभाग (रोजगार हमी योजना), कृषी व सामाजिक वनीकरण विभाग गावोगावी जनजागृतीबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधत बांबू लागवडीचे महत्त्व सांगत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे चार हजार २३९ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जुलैअखेर जिल्ह्यातील दोन हजार १०५ शेतकऱ्यांनी एक हजार १४८ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड सुरू केली आहे.
इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या शेतीवर ३० ते ४० टक्के कमी खर्च येत आहे. बांबू लागवडीमुळे शेत जमिनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा सुद्धा फायदा होत आहे. बांबू लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षांनंतर बांबू काढता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे.
बांबू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये गावोगावी जनजागृती केली जात आहे. पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक नफ्याच्या दृष्टीने बांबू लागवड फायदेशीर असल्याने जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे.
- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी