भुईंज: चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून तीन वेळा उलटून झालेल्या भीषण अपघातात चिपळून येथील दोघे ठार झाले. तर तीघे जण जखमी झाले. मुंबईवरून चिपळूणकडे जाताना सातारा-पुणे महामार्गावर सुरूर येथे आज (शनिवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
विजय धोंडू पवार (वय ७०) व वैष्णवी वैभव कदम (४३, दोघेही रा. चिपळूण) अशी मृतांची नावे आहेत. वैभव वामन कदम (४५), वैशाली विजय पवार (६२), वेदांत वैभव कदम (१३) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेली माहिती अशी की, वैभव कदम हे मुंबईहून चिपळूणकडे कारने (MH-१४-BK-७९३३) निघाले होते. सातारा-पुणे महामार्गावर सुरूर येथे चालक वैभव यांना झोप लागल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी कार सर्व्हिस रोडवरील डिव्हायडरला धडकून तीन वेळा पलटी झाली. यात कारमधील विजय पवार व वैष्णवी वैभव कदम यांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले. जखमींना तत्काळ सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कार दुभाजकाला धडकून उलटली; चिपळूण येथील दोघे ठार; तीनजण जखमी, सातारा-पुणे महामार्गावर सुरूर येथे अपघात
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा