अंमली पदार्थांविरोधात सातारा पोलिसांचा निर्णायक टप्पा; 17 गुन्ह्यांतील जप्त 509 किलो अंमली पदार्थांची वैधानिक पद्धतीने विल्हेवाट

by Team Satara Today | published on : 20 July 2026


सातारा : अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी सातारा जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सुमारे 509 किलो अंमली पदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावली. सुमारे 64 लाख 13 हजार 147 रुपये किमतीचा गांजा, गांजाची झाडे आणि अफूची झाडे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कराड येथील जैववैद्यकीय कचरा निर्मूलन केंद्रातील उच्च तापमानाच्या भट्टीत नष्ट करण्यात आली.

जिल्हा अंमली पदार्थ नाश समितीच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील 14 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 17 गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल यामध्ये समाविष्ट होता. संबंधित प्रकरणांमध्ये इन्व्हेंटरी पंचनामा, रासायनिक विश्लेषणाचा अहवाल आणि न्यायालयाची आवश्यक परवानगी मिळाल्यानंतरच नाशाची कारवाई करण्यात आली.

अंमली पदार्थांची विल्हेवाट पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने व्हावी यासाठी न्याय सहायक प्रयोगशाळा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वैधमापनशास्त्र विभाग तसेच शासकीय पंच यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकृत जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पातील विशेष भट्टीचा वापर करण्यात आला.

या कारवाईस जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष शिंदे, पोलीस उपअधीक्षक (गृह) कृष्णकुमार जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक रासायनिक विश्लेषक श. भा. गटकळ, निरीक्षक डी. व्ही. तेलंग, व्यवस्थापक राहुल पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील मोहिमेला सातत्याने गती देण्यात येत असून, अशा गुन्ह्यांमध्ये जप्त होणारा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच तातडीने नष्ट करण्याचे धोरण जिल्हा पोलिसांनी कायम ठेवले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वडूथ-आरळे पुलावरील पेट्रोल टँकरची आग वेळीच विझली; मोठा अनर्थ टळला, स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे आग वेळीच आटोक्यात
पुढील बातमी
शिवथर येथे कंटेनरमधून तब्बल 1.98 कोटींच्या बनावट गोवा दारूचा साठा जप्त; सातारा तालुका पोलिसांची कारवाई; एक अटकेत, दुसरा संशयित फरार

संबंधित बातम्या