पाटण : दुचाकी आणि मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात बापलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नानेगाव गावठाण परिसरात हा अपघात झाला. नितीन आत्माराम पाटील (वय 36) आणि शिवन्या नितीन पाटील (9, दोघेही रा. माजगाव, ता. पाटण) असे त्या दुर्दैवी बापलेकीचे नाव आहे. तर अवनी नितीन पाटील (वय 6) असे जखमी मुलीचे नाव आहे.
माजगाव येथील शेतकरी नितीन पाटील हे दोन मुलींना बरोबर घेऊन मोटारसायकलवरून उंब्रजला कामानिमित्त जात होते. दुचाकी नानेगाव गावठाणनजीक आली असता, उंब्रजकडून भरधाव मोटारीला दुचाकीची समोरासमोर धडक बसली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, नितीन यांची छोटी मुलगी शिवन्या पाटील ही जागीच ठार झाली होती. तर नितीन पाटील यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. तर अवनी पाटील ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक वैभव निवास पाटील (रा. चाफळ) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.