कराड, दि. ८ : गणेश विसर्जनासाठी डीजे का आणला ? अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून बापलेकाला मारहाण करण्यात आली. बनवडी, ता. कराड येथे ही घटना घडली. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुदेश भीमराव थोरात (रा. जलविहार कॉलनी बनवडी, ता. कराड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संग्राम देवकर, श्रेयस गायकवाड, आशिलेष गौड , संस्कार जाधव, सुजल आगा यांच्यासह अन्य तीन ते चार अनोळखी लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बनवडीतील जलविहार कॉलनी सार्वजनिक गणेश मंडळ असून या गणेश मंडळाचे सुदेश थोरात हे सदस्य आहेत. शनिवारी गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सुदेश थोरात यांना घरातून फोन करून बाहेर बोलवण्यात आले होते. थोरात हे आपल्या मुलासह घराबाहेर गेल्यानंतर काहीही न विचारता त्यांना व त्यांच्या मुलास मारहाण करण्यात आली. तसेच पुन्हा मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.