सातारा: जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढू लागल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असतानाच, दुसरीकडे लहान मुलांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे साताऱ्यात 'समर डायरिया'च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून, अनेक बालकांना ताप आणि जुलाबाचा त्रास होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत दूषित पाणी आणि उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या तापमानामुळे अन्नपदार्थांमध्ये रासायनिक प्रक्रिया जलद होऊन ते लवकर खराब होतात. उष्ण हवामानामुळे साल्मोनेला आणि ई-कोलाय सारख्या जीवाणूंची वाढ वेगाने होत असल्याने शिळे किंवा उघड्यावरील अन्न खाल्ल्यास अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच उन्हाळ्यात जलस्त्रोत आटल्याने अनेकदा दूषित पाण्याचा पुरवठा होतो, जो पोटाच्या विकारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. रस्त्यावरील कापलेली फळे, थंड पेये आणि बर्फाचे गोळे यांवर बसणाऱ्या माश्यांमुळे गॅस्ट्रोचे विषाणू वेगाने पसरत असून सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या आजाराचा फटका सर्वाधिक बसत आहे. सततच्या उलट्या आणि जुलाबांमुळे मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो, अशा परिस्थितीत मुलांवर तत्काळ उपचार होणे गरजेचे आहे. नागरिकांनी आणि विशेषतः पालकांनी उन्हाळ्याच्या या काळात पाणी नेहमी उकळून आणि गाळून प्यावे, उघड्यावरील कापलेली फळे किंवा ज्यूस पिणे टाळावे तसेच अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावेत. मुलांच्या आहारात जास्तीत जास्त द्रव पदार्थांचा समावेश करावा आणि आजारपण जाणवल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.