सातारा : सातारा पालिकेने यंदा थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडाकेबाज कारवाया सुरू ठेवल्या आहेत. मल्हारपेठ येथील सर्वे नंबर 97 मध्ये गोकुळ मंगल कार्यालय व नऊ गाळे तसेच कार्यालयालगतचे दोन असे तब्बल बारा गाळे सातारा पालिकेच्या वसुली विभागाने सील केले. या थकबाकीदाराची पाच लाख सहा हजार सातशे अठरा इतकी थकबाकी आहे. तसेच एक नळ कनेक्शनही कट करण्यात आले आहे.
सातारा पालिकेने तब्बल 36 कोटीचा महसूल आतापर्यंत प्राप्त केलेला आहे. थकबाकीदारांनी घरपट्टी भरून सहकार्य करावे व कटुता टाळावी, असे आवाहन पालिका प्रशासक मुख्याधिकारी अभिजीत बापट हे वारंवार करत आहेत. उद्दिष्ट पूर्तीसाठी पालिकेला अद्याप अकरा कोटी सत्तर लाखाची गरज आहे. पालिकेने मल्हार पेठेतील मिळकतधारक रुद्रप्पा तावस्कर, पद्माकर तावस्कर, दिलीप पावसकर, किरण तावस्कर, कालिदास तावस्कर, यांच्या गोकुळ मंगल कार्यालयासह बारा गाळे सील केले. थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईंमध्ये वॉरंट अधिकारी उमेश महादर, अमित निकम, भाग लिपिक संजय कोळी, राजेश भोसले, राजेंद्र शेळके, भारत चौधरी, तुकाराम गायकवाड, युवराज खरात, अशोक चव्हाण, युवराज खरात, नितीन रणदिवे, अनिल बडेकर यांनी सहभाग नोंदवला होता. तसेच शुक्रवार पेठ येथील प्रभाकर नरहरी कुलकर्णी यांची थकबाकी दहा लाख 26 रुपये इतकी होती. त्यामुळे त्यांचेही नळ कनेक्शन कट करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली.