महाबळेश्वर : महाबळेश्वर-तापोळा या मुख्य रस्त्यावर चिखली शेड परिसरात पडझड झालेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने भराव टाकण्यात आला. त्यानंतर गॅबियन भिंतीचे काम प्रगतीपथावर आहे. दोनच दिवसांपूर्वी तापोळा रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. दोन दिवसात भुगर्भ शास्त्रज्ञांकडून या ठिकाणची पाहणी केली जाणार आहे. तसेच पावसाळ्यानंतर डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांनी दिली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर-तापोळा हा नव्याने बांधण्यात आलेला रस्ता जून महिन्यामधील अतिवृष्टीमुळे चिखली शेडनजीक खचला होता. यामुळे खोल दरी निर्माण झाली होती. यानंतर बांधकाम विभागाच्यावतीने जेएसीबी व पोकलेनच्या साहाय्याने मलबा हटवण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र, पावसाचा जोर वाढल्यामुळे काम करण्यात अडचणी येत होत्या व पुन्हा त्याच जागी रस्त्याची मोठी पडझड झाल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूणपणे ठप्प झाली. महाबळेश्वर तापोळा प्रमुख रहदारीचा रस्ता असल्यामुळे तापोळा भागामधून येणार्या - जाणार्या नागरिकांचे हाल होत होते. हा धोकादायक रस्ता बंद करण्यात आल्याने तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक ही मांघर या पर्यायी मार्गे सुरु ठेवण्यात आली. काही दिवसांपूर्वी रस्त्याची पाहणी ना. मकरंद पाटील यांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.