पंचम ग्रुप आयोजित मुग्धा वैशंपायनची आश्वासक मैफिल

by Team Satara Today | published on : 27 June 2025


सातारा  : सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन यांची मैफिल पंचम या संस्थेने आयोजित केली होती. या बहुप्रतिक्षित मैफिलीला सातारकर श्रोत्यांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. मुग्धाचे सुगम संगीत गायन रसिकांनी विविध वाहिन्यांवर ऐकलेले होते. मात्र ती राग- संगीत कशी सादर करते, याविषयी श्रोत्यांना उत्सुकता होती.

तिने मैफिलीचा प्रारंभ "राग पूर्वा" ने केला. मुग्धाने विलंबित ख्यालाची "अरे मन तू" ही गंधारावर सम असलेली बंदिश तीनतालामध्ये गायली. सुरेल आलापीबरोबरच खर्जातील घुमारेदार स्वर वैशिष्ट्यपूर्ण वाटले. डौलदारपणे आणि चपखलपणे समेवर येणे हे विदुषी शुभदा पराडकर यांचे वैशिष्ट्य मुग्धाच्या गाण्यात ठिकठिकाणी जाणवले. संधी मिळताच संवादिनी वादक अमेय बिच्छू यांनी सुरेख आवर्तन भरले. अमेय बिच्छू यांनी हजरजबाबी संगत केली. यानंतर द्रुत तीनतालातील "अब कैसे जाऊं धीट लंगर छेडत" ही बंदिश सादर केली. त्यानंतर राग हमीर मधील रुपक या तालातील "सुन सुन रे " ही प्रसिद्ध बंदिश गायली. अमेय बिच्छू यांनी "निसांरें-निसाधप गमप -गमरेसा" अशी स्वरावली योग्य अंदाजात वाजवून श्रोत्यांची दाद मिळवली. यानंतर दृत तीनतालातील "सुरजन सुमि ला दे मैको" ही सदारंग रचित बंदिश सादर करून शेवटी तराणा सादर केला.

मध्यंतरानंतरच्या सत्राची सुरुवात राग मारू बिहाग मधील तिलवाडा तालातील "गान करत जीवन सुखदायी " ही बंदिश सादर करून केली. यानंतर द्रुत तीन तालातील "करत आनंद सखियन के संग" ही बंदिश आणि शेवटी तराना सादर केला. या दोन्ही बंदिशी वि. शुभदा पराडकर यांच्या होत्या तर तराण्याची रचना आग्रा घराण्याचे प्रसिद्ध विद्वान गायक पं.बबनराव हळदळकर यांची होती. यानंतर "पद्मनाभा नारायणा" हे सुप्रसिद्ध पद सादर केले. कौस्तुभ आठल्ये यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील दृत एकतालातील "काळोख रंध्रात परवशता माथी - निपलजाच तरीही सूर्य भरत भू ललाटी" हे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी समर्थ रामदास स्वामी रचित भैरवी रागातील "कल्याणकारी रामराया" ही रचना आणि त्याला जोडूनच संत चोखामेळा रचित "अवघा रंग एक झाला" हा विदुषी स्व. किशोरी आमोणकर यांनी गायलेला आणि संगीतबद्ध केलेला प्रसिद्ध अभंग सादर केला.

पंचमच्या आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमातील मुग्धा वैशंपायन ही सर्वात तरुण कलाकार ठरली. ती विविध वाहिन्यांमुळे सुगम संगीतासाठी प्रसिद्ध आहे. मात्र तिने या मैफिलीत शास्त्रीय संगीतावर अधिक भर दिला. मैफिल खूप श्रवणीय झाली. मुग्धा ही उदयोन्मुख आश्वासक गायिका आहे, याची प्रचिती या मैफिलीमुळे आली. या मैफिलीसाठी आशय कुलकर्णी यांनी लयदार, वजनदार आणि संयमित तबला संगत केली. अमेय बिच्छू यांची संवादिनी संगत सुसंवाद साधणारी होती. मिथाली लोहार आणि सुप्रिया कुलकर्णी यांनी तानपुरा संगत केली.

कलाकारांचे स्वागत जेष्ठ गायक राजेंद्र मणेरीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन ॲड. गिरीश कुलकर्णी यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जगन्नाथ रथयात्रेत तीन हत्ती अचानक बिथरले
पुढील बातमी
जिल्हा रुग्णालयात 0 ते १८ वयोगटातील 115 बालकांची मोफत टू डी इको तपासणी

संबंधित बातम्या