मराठीचा अभिमान जपत ज्ञान व कौशल्यातून जागतिक झेप घ्या - प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, रहिमतपूरच्या बाबासाहेब माने महाविद्यालयात मराठी भाषा सन्मान दिन साजरा

by Team Satara Today | published on : 11 October 2026


रहिमतपूर : मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेचा अभिमान बाळगतानाच तरुणांनी वाचन, ज्ञान आणि नव्या कौशल्यांच्या बळावर स्वतःची प्रगती साधावी. मातृभाषेशी नाते जपत अन्य भाषा शिकाव्यात आणि आत्मविश्वासाने जागतिक स्तरावर कर्तृत्वाची झेप घ्यावी, असे आवाहन प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले.
येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयात ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’निमित्त आयोजित व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नँक समन्वयक डॉ. गोरख बनसोडे होते. छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील मराठी विभागाचे माजी प्रमुख प्रा. डॉ. वाघमारे यांनी मराठीची ऐतिहासिक वाटचाल, वाचनसंस्कृती, भाषिक कौशल्ये आणि तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकातून आयोजनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. विद्यार्थिनींच्या मनोगत व काव्यसादरीकरणाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मराठी बोलण्याचा, लिहिण्याचा आणि तिला मनापासून जपण्याचा संकल्प सुरुवातीच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आला. सिद्धी निकम हिने मराठी माती, भाषेची गोडी आणि मराठीने दिलेली ओळख यांचा अभिमान व्यक्त करणारी कविता सादर केली. रितिका शिंदे हिने नवी स्वप्ने पाहून यशाचे शिखर गाठण्याबरोबरच आई-वडिलांचा मान वाढवावा आणि चांगला माणूस म्हणून आनंदाने जगावे, असा विचार मनोगतातून मांडला. सहभागी विद्यार्थिनींचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थिनींच्या सादरीकरणाचे कौतुक करत वाघमारे म्हणाले, भाषा ही संवादाबरोबरच विचारांच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे. व्यासपीठावर येऊन बोलल्याने भाषिक कौशल्यांना वाव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संकोच दूर करून मनोगत, काव्यवाचन, वक्तृत्व आणि सूत्रसंचालन यांसारख्या उपक्रमांत सहभागी व्हावे.
मराठीच्या अभिजाततेविषयी मार्गदर्शन करताना त्यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठीला मिळालेल्या अभिजात दर्जाचा उल्लेख केला. भाषेची प्राचीनता, ऐतिहासिक पुरावे आणि समृद्ध साहित्यपरंपरा यांचे महत्त्व स्पष्ट करून त्यांनी नाणेघाटातील शिलालेख, महाराष्ट्री प्राकृतमधील ‘गाथा सप्तशती’, ‘विवेकसिंधू’ आणि ‘लीळाचरित्र’ यांचे संदर्भ दिले. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात मराठीच्या सामर्थ्याचा प्रत्यय दिला. ज्ञानेश्वरी, तुकारामांची अभंगगाथा, महानुभावांचे गद्य, पंडिती वाङ्मय, बखरी, पोवाडे, लावण्या आणि भारुडे अशा विविध साहित्यप्रकारांनी मराठीचे विश्व समृद्ध केले आहे, असे त्यांनी सांगितले.
संत आणि समाजसुधारकांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता वाघमारे यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यातून स्वाभिमान, शिक्षण, समता आणि मानवी प्रतिष्ठेची प्रेरणा मिळते. या विचारांचा अभ्यास करून त्यांना आचरणाची जोड दिल्यास शिक्षण अधिक अर्थपूर्ण होते, असे ते म्हणाले.
भाषा संवर्धनासाठी नव्या पिढीची सर्जनशीलता आणि बोलीभाषांतील अनुभव यांना संधी द्यावी, असे सांगताना त्यांनी शिक्षक युवराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी कवी आबा महाजन यांच्या कवितांचा बंजारा समाजाच्या बोलीत केलेल्या अनुवादाचा उल्लेख केला. अशा उपक्रमांतून भाषांमधील संवाद वाढतो आणि मुलांना स्वतःच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य उमगते, असे त्यांनी नमूद केले.
“पुस्तक हे मस्तक घडवत असते,” असे सांगत वाघमारे यांनी नियमित अवांतर वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी दररोज किमान अर्धा तास वाचन करावे. पुस्तके विचारांची व्याप्ती वाढवतात, अनुभवविश्व समृद्ध करतात आणि विवेकाने निर्णय घेण्याची क्षमता विकसित करतात. सोन्या-नाण्यांच्या प्रदर्शनापेक्षा ज्ञानसंपन्न होण्याला महत्त्व द्यावे. घरातील पुस्तकांचे कपाट हे वैचारिक समृद्धीचे साधन बनावे, असे त्यांनी सांगितले.
मराठीचा अभिमान जपतानाच परदेशी भाषा शिकून प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्यात, असे आवाहन करताना त्यांनी आपल्या मुलाच्या जपानी भाषा अध्ययनाचा अनुभव सांगितला. कोरोना टाळेबंदीच्या काळात ऑनलाइन माध्यमातून जपानी भाषा शिकण्यास सुरुवात करून त्याने पुढे जपानमध्ये शिक्षण व कामाचा मेळ साधला आणि भाषण स्पर्धेत यश मिळविले. शिकण्याची तयारी, सातत्य आणि कष्ट यांच्या बळावर तरुणांना जागतिक संधींचा लाभ घेता येतो, असे वाघमारे म्हणाले.
मोबाईल व इंटरनेटचा उपयोग ज्ञानवृद्धी आणि कौशल्यविकासासाठी करावा. लेखन, अनुवाद, वक्तृत्व, सूत्रसंचालन, लघुपटनिर्मिती आणि डिजिटल माध्यमांसाठी आशयनिर्मिती अशा क्षेत्रांत भाषिक कौशल्यांना वाव आहे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षणात सातत्य ठेवावे आणि सन्मानाने अर्थार्जन करण्यासाठी स्वतःला सक्षम करावे. वैयक्तिक प्रगतीसोबत सामाजिक जबाबदारीचे भानही जपावे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात नँक समन्वयक डॉ. गोरख बनसोडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षण, आरोग्य आणि चारित्र्य यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. व्यसनाधीनता, क्षणिक राग आणि अविचारी वर्तनामुळे आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रुग्णालय व कारागृह भेटींतील अनुभव सांगत त्यांनी संयम, विवेक आणि जबाबदार वर्तनाची गरज स्पष्ट केली.
प्रा. डॉ. वाघमारे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आणि शैक्षणिक व साहित्यिक योगदानाचा गौरव करत डॉ. बनसोडे यांनी जिद्द व कष्टांच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, असे सांगितले. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाने वाघमारे यांनी सुचविलेले ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य स्वीकारल्याचा विशेष उल्लेख करून विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि कर्तृत्वाने स्वतःचे जीवन उजळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी अभिप्राय व्यक्त करून वाचन, भाषा अध्ययन आणि आत्मविश्वासाने प्रगती करण्याविषयी मिळालेल्या प्रेरणेचा उल्लेख केला. सूत्रसंचालनातून कार्यक्रमातील विविध सादरीकरणांची सांगड घालण्यात आली. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली..
सूत्रसंचालन प्रा.मुल्ला सर यांनी केले.आरती मोरे, सिद्धी निकम,रितिका शिंदे, अदिती शितोळे या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास प्रा. प्रशांत साळवे, प्रा. शिवाजी चव्हाण, प्रा. अशोक शिंदे प्रा राहूल गंगावणे,  प्रा. रेश्मा सुतार उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी सकस चारा व्यवस्थापनाबाबत काळोशी येथे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रम
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाचा भक्तिमय जागर; आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिरांचे रूपडे पालटले; घटस्थापना, देवीच्या स्वागतासाठी लगबग

संबंधित बातम्या