सातारा : मुलाच्या वाहनामुळे झालेल्या अपघातातील जखमीच्या उपचाराचा खर्च देण्याची मागणी करीत शाहूपुरीतील एका व्यक्तीला धमकावून चारचाकीतून जबरदस्तीने नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास तुम्हाला आणि तुमच्या मुलाला सोडणार नाही, अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल बाबुराव बेंदाडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. बेंदाडे हे शाहूपुरीतील गजानन अपार्टमेंटमध्ये राहतात. गुरुवारी दुपारी एका व्यक्तीने त्यांना फोन करून बाँबे रेस्टॉरंट परिसरात बोलावून घेतले.
तेथे गेल्यानंतर चौघांनी बेंदाडे यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात झाल्याचे सांगितले. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याचे सांगून संबंधित रक्कम देण्याची मागणी करण्यात आली.
बेंदाडे यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांना धमकावण्यात आले. त्यानंतर चौघांनी त्यांना जबरदस्तीने चारचाकीत बसवून कोरेगावच्या दिशेने नेले. या वेळी त्यांना मारहाणही करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर बेंदाडे यांनी सातारा शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. हवालदार मोरे तपास करीत आहेत.
जखमीच्या उपचाराचा खर्च देण्याची मागणी करत शाहूपुरीतील एका व्यक्तीचे अपहरण;अन्यथा मुलाला सोडणार नाही, धमकी देत व्यक्तीला गाडीत कोंबले
by Team Satara Today | published on : 03 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा