एसटी राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची विश्वासू जीवनवाहिनी; सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य - परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

by Team Satara Today | published on : 05 July 2026


मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची 'लालपरी' ही केवळ प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी बस नसून, राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्याची विश्वासू जीवनवाहिनी बनली आहे. दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्याचे सामाजिक दायित्व एसटी महामंडळ गेली अनेक दशके यशस्वीपणे पार पाडत असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

मंत्री सरनाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी महामंडळाकडून शालेय वेळेत बसस्थानकांवर पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. हे कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमध्ये चढण्यास मदत करतात. तसेच, प्रवासादरम्यान कोणतीही अडचण उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी एसटीने स्वतंत्र टोल-फ्री मदत केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा एसटीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

राज्यात दररोज सुमारे ३०,१७७ शालेय फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक अडथळा येऊ नये, यासाठी एसटी महामंडळ विविध प्रवासी सवलतींच्या योजना प्रभावीपणे राबवत आहे.

अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना १०० टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय शैक्षणिक सहलींसाठी ५० टक्के सवलत, मासिक विद्यार्थी पासवर ६६.६७ टक्के सवलत, तसेच उन्हाळी सुट्टी, परीक्षा, शैक्षणिक शिबिरे किंवा आजारी पालकांना भेटण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रवासासाठीही ५० टक्के सवलत देण्यात येते.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातच २५.१३ लाख अहिल्याबाई होळकर पास आणि २७.९८ लाख विद्यार्थी मासिक पास वितरित करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी NCMC स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रियाही सुरू असून, त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होणार आहे. याशिवाय कौशल्य सेतू अभियानांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासभाड्यात ६६.६७ टक्के सवलत देण्यात येत आहे. तसेच मानव विकास योजनेअंतर्गत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ९६६ बसेसद्वारे ७३,६२१ मुलींना मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत शिक्षणातील समान संधीचे स्वप्न साकार करण्यात येत आहे.

"एसटीची 'लालपरी' ही आज केवळ रस्त्यावर धावणारी बस नाही, तर ती प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नांची सारथी, प्रत्येक पालकाच्या विश्वासाची हमी आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत धावणारी ज्ञानगंगा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा दीप अखंड तेवत ठेवण्याचे हे सामाजिक कार्य एसटी महामंडळ यापुढेही अधिक सक्षमपणे, संवेदनशीलतेने आणि समर्पित भावनेने सुरू ठेवेल," असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे-सातारा, रायगड-नाशिकला सोमवारपर्यंत 'रेड अलर्ट'; राज्यातील पाऊस ८ जुलैपासून कमी होणार असल्याचा अंदाज
पुढील बातमी
मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; धरणाचा पाणीसाठा १४ टीएमसीवर

संबंधित बातम्या