सातारा : मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध रान भाज्यांचा समावेश असतो. पूर्ण नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या भाज्यांचे त्याचे आरोग्यविषयक महत्व व माहिती जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना होण्यासाठी कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सातारातर्फे सातारा शहरात स्वातंत्र्यदिन शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव” आयोजित केला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आदी उपस्थित राहणार आहेत.
सदर महोत्सव वृंदावन मल्टीपर्पज हॉल, राधिका रोड, कदम पेट्रोल पंपासमोर, सातारा येथे होणार असून येथे व्रिक्री व्यवस्थाही करण्यात असून सातारा जिल्हयात आढणा-या विविध प्रकारच्या रानभाज्या जसे आघाडा, ढेसा, अळु, करडू, तांदुळजा, बांबु, गुळवेल, केना, शेवगा, पिंपळ, पाथरी, घोळ, चुका, सराटा, शेवग्याची पाने, चिघळ, पाथरी, उंबर, पानफुटी, टाकळा, माठ, केळफुल, लाल भोपळा, भुई आवळी, आंबोशी, मायाळू, दिंडा, करडई, चंदन बटवा, कडवंची, चुका, भारंगी, पिंपळ, आंबाडी, हादगा या भाज्या शेतक-यांकडुन थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक अजय शेंडे यांनी केले आहे.