बारामती : विधानसभा निवडणणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजप, शिंदे गट आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने देखील उमेदवार जाहीर केले आहेत. अजित पवार यांच्या पक्षाने पहिली यादी जाहीर करत 38 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वांत जास्त लक्ष हे बारामती मतदारसंघाकडे लागले होते. अखेर याबाबत निर्णय जाहीर झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पक्षाने 38 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांसह बारामती विधानसभा मतदारसंघाची देखील उमेदवारी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवार हेच विधानसभेला लढत देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही यादी जाहीर केली आहे. अजित पवार हेच बारामतीचे राष्ट्रवादीचे शिलेदार राहणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील बारामती मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेमध्ये कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार हे बारामती मतदारसंघ सोडणार असल्याचे बोलले जात होते. बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार हे त्यांच्या ऐवजी त्यांच्या मुलाला संधी देणार असल्याचे बोलले जात होते. मात्र बारामतीचा गड अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवला आहे.
शरद पवार गटाकडून बारामतीसाठी नवीन दादा शोधण्याचे काम सुरु होते. लोकसभा निवडणुकीनंतर रोहित पवार हे बारामतीमध्ये लढत देणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता अजित पवार यांचे पुतणे व शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे बारामती विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये येणार असल्याची दाट शक्यता आहे. रोहित पवार हे त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार असून युगेंद्र पवार हे बारामतीमधून लढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबामध्ये लढत होणार आहे. काका विरुद्ध पुतण्या अशी बारामती विधानसभा निवडणूक रंगणार आहे.