झेडपीच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष; सभा वादळी ठरणार का ? विरोधकांची भूमिका काय राहणार?

by Team Satara Today | published on : 16 April 2026


सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडीनंतर आता पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता होणारी ही सभा वादळी ठरणार का, तसेच विरोधकांची भूमिका काय राहणार, याबाबत जि.प. वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा पार पडणार आहे. या सभेत विविध विषय समित्यांसाठी सदस्यांची निवड केली जाणार असून, महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सदस्य विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना आपापल्या विभागाचा सविस्तर अहवाल तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अध्यक्षांकडे स्थायी व जलसंधारण समितीचे सभापतिपद, तर उपाध्यक्षांकडे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापतिपद सोपवण्यात येणार आहे. याशिवाय उपाध्यक्ष व सभापतींना विषय समित्यांचा पदभार देणे, विविध समित्यांवर सदस्यांची निवड करणे आणि विभागप्रमुखांना संबंधित समित्यांचे सचिव म्हणून नियुक्त करणे असे तीन प्रमुख विषय सभेच्या अजेंड्यावर आहेत. या विशेष सभेत स्थायी समितीसह जलव्यवस्थापन व स्वच्छता, कृषी, समाजकल्याण, शिक्षण व क्रीडा, बांधकाम, अर्थ, पशुसंवर्धन व दुग्धशाळा, आरोग्य तसेच महिला व बालकल्याण समित्यांसाठी सदस्यांची निवड होणार आहे.

निवड प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विस्तार अधिकाऱ्यांना मतदान अधिकारी क्रमांक १, तर कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना मतदान अधिकारी क्रमांक २ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीवेळी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून, सभेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे ही सभा कशी पार पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महापुरुषांच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंटमुळे साताऱ्यात आंबेडकर अनुयायी आक्रमक; शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात पहिल्यांदाच मोठी जाहीर सभा; २० एप्रिलला गांधी मैदानावर होणाऱ्या सभेची जोरदार तयारी

संबंधित बातम्या