सातारा : सातारा औद्योगिक वसाहती मधील पशुसंवर्धन विभागाची पाच एकर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर यांच्या परवानगीने कर्मचारी राज्य विमा निगम विभागाकडे कामगार हॉस्पिटल साठी हस्तांतरित करण्यात आली. या प्रक्रियेच्या संदर्भाने भूखंड हस्तांतरण पत्र कर्मचारी राज्य विमा निगमचे रमेश चांदणे यांनी स्वीकारले. हॉस्पिटलच्या उभारणीचा मार्ग आता या निमित्ताने मोकळा झाला आहे.
सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये एक लाख कामगार आणि दोन लाख 70 हजार कुटुंबीय वैद्यकीय सुविधांसाठी कर्मचारी राज्य विमा निगम वर अवलंबून आहेत. जिल्ह्यामध्ये कर्मचारी राज्य विमा निगम विभागाचे हॉस्पिटल नसल्याने यासंदर्भात मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे सातारा जिल्ह्यात 100 बेडचे कर्मचारी राज्य विमा निगम हॉस्पिटल मंजूर झाले. या जागेचे हस्तांतरण पत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयाकडून नुकतेच वितरित करण्यात आले. सातारा औद्योगिक क्षेत्रात जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाची पाच एकर जागा शिल्लक होती. भूखंड क्रमांक सी थ्री मध्ये या हॉस्पिटलला जागा देण्यात आली आहे. याबाबतचा पाठपुरावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समन्वयाने या जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला होता. दुग्ध व्यवसाय विकास विभागाने ईएसआयसी हॉस्पिटल करता पाच एकर जागा राज्य विमा निगम विभागाकडे हस्तांतरित करण्यास परवानगी दिली होती. त्याची शिफारस स्वतः शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. ही प्रक्रिया गुरुवारी पूर्ण करण्यात आली.
यावेळी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी डॉक्टर अमित कुमार सोंडगे यांनी भूखंड हस्तांतरण पत्र कर्मचारी राज्य विमा निगमचे शाखा व्यवस्थापक रमेश चांदणे यांना सुपूर्द केले. तसेच या भूखंडाची बुकरमापकांच्या वतीने मोजणी करण्यात आली. कामगार हॉस्पिटलच्या जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने हॉस्पिटलच्या उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मास च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व मागच्या पदाधिकार्यांचे आभार मानण्यात आले आहेत.