सातारा : महाबळेश्वर गिरीस्थान क्षेत्रातील पर्यटनाचा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाचा घाट घातला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या प्रकल्पाचा प्रारूप विकास आराखडा हरकतींसह जाहीर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 12 हजार 809 कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य शासनाचे काम शंभर दिवसाच्या उद्दिष्टानुसार वेगाने सुरू झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाने गती घेतली आहे.
या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करणार आहे. 613 हरकतींच्या विकास आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये बाजे तालुका पाटण येथे 0.45 किलोमीटर ते दोन किलोमीटर अंतराचे छोटे विमानतळ तसेच उरमोडी येथे दोन किलोमीटर लांबीची सी प्लेन धावपट्टी तयार केली जाणार आहे. तापोळा येथेसुद्धा सी प्लेन उतरवण्याची सुविधा करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजे येथील पोर्ट विमानतळामुळे वाल्मिकी पठार, कोयना धरण, हेळवाक या परिसरात सहज पोहोचणे शक्य होणार आहे. याशिवाय बामणोली, ठोसेघर, कास पठार या भागाचाही पर्यटकांना आनंद घेणे शक्य होणार आहे.
इको टूरिझम पर्यटनाला चालना मिळेल, यादृष्टीने न्यू महाबळेश्वर प्रकल्पाचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये टुरिस्ट पॅराडाईज, सायकल ट्रॅक, छोटी विमानतळे, फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे. या विविध सोयी सुविधांसाठी तब्बल 12 हजार 809 कोटी रुपये खर्च येणार आहे. या कामासाठी राज्य शासनाने विविध कंपन्यांची निविदा प्रक्रिया राबवली असून पुढील टप्प्यांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. याशिवाय खगोल प्रेमींसाठी डार्क स्काय पार्क रेट्रो विलेज म्हणजे आकाशातील तारे स्पष्टपणे पाहण्यासाठी पाटण तालुक्यातील अरळ व काठी या भागात डार्क स्काय पार्क या ठिकाणी खगोल प्रेमींना टेंट उभारून त्यात आकाश न्याहाळता येणार आहे.