न्हाळेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात २६ महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू; अचानक वीज गेल्याने घडली दुर्दैवी घटना, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 04 October 2026


सातारा : सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जय संदीप खंडागळे या २६ महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने पसरलेल्या अंधारात ही घटना घडली असून, या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सातारा परिसरात तीव्र हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.
​न्हाळेवाडी येथील ओढ्यालगत शनिवारी सायंकाळी सव्वा सात ते साडेसातच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. याच अंधाराचा फायदा घेऊन ओढ्यालगतच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने घरासमोर खेळत असलेल्या जयवर झडप घालून त्याला ओढत नेले. कुटुंबीयांचा आक्रोश ऐकून गावातील तरुणांनी तातडीने बॅटऱ्या आणि काठ्या घेऊन ओढ्याच्या दिशेने धाव घेतली. तरुणांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे आणि दगडफेकीमुळे बिबट्याने मुलाला सोडून पलायन केले. ग्रामस्थांच्या धाडसामुळे बिबट्या पळाला असला, तरी त्याच्या तीक्ष्ण दात आणि नखांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयला तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला.
​या दुर्दैवी घटनेनंतर मालगाव-न्हाळेवाडी परिसरात भीतीचे सावट पसरले असून, वन विभाग आणि महावितरणच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने परिसरात तत्काळ पिंजरा लावावा आणि रात्रीच्या वेळी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दलित महासंघाच्या संघटना बांधणीसाठी मंगळवारी साताऱ्यात बैठकीचे आयोजन; उमेश चव्हाण व सूर्यकांत काळे यांची माहिती

संबंधित बातम्या