सातारा : साहित्यामधील सजीव अनुभवांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात .साहित्यामध्ये आपल्या जवळच्या परिसराचा आपल्याला भेटणाऱ्या माणसांचा येणाऱ्या अनुभवांचा आरसा पहावयाला मिळतो. जीवनातल्या वेगवेगळ्या अनुभवांमधील जिवंत संवेदना टिपण्याचे खरे कार्य लेखकाचे असते तेच गेली चार दशके मी प्रामाणिकपणे करत आहे. त्यातूनच आज पर्यंत ही साहित्य निर्मिती होऊ शकली, अशी प्रांजळ कबुली साताऱ्यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 'पानिपतकार' विश्वास पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा सातारा व मावळा फाउंडेशन यांच्यावतीने येथील शाहू कला मंदिर मध्ये विश्वकोश महामंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित यांच्या हस्ते विश्वास पाटील यांचा शाल श्रीफळ मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे,झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट ,मावळा फाउंडेशनचे चंद्रकांत बेबले, मसाप शाहूपुरी शाखा साताराचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, किशोर बेडकीहाळ, डॉ राजेंद्र माने उपस्थित होते .
विश्वास पाटील पुढे म्हणाले, मराठी भाषा ही अनेक टप्प्यातून विकसित झाली आहे.ती जशी वळवावी तशी वळते. लेखकाला जिथे जे उत्तम सापडेल ते त्याने वेचावे हा लेखकाचा धर्म आहे .ज्यांचे अनुभव मिळाले आणि ज्यांच्या उपस्थितीने आयुष्य समृद्ध झाले अशा सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांच्या चौकटीवर माथा टेकवून मी साताऱ्यात आलो आहे. माझ्या प्रशासकीय कालखंडात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला प्रशासकीय वाटचालीत नेहमीच बळ दिले. मुंबई जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना केवळ तीन दिवसात कॅबिनेट नोट सादर करून शिर्डी विमानतळासाठी दीडशे कोटी रुपये मी मिळवले होते.अशी आठवण यानिमित्ताने पाटील यांनी सांगितली.
सरस्वतीची गेली चार दशके सेवा घडली
नागपूर येथे एका हॉटेलमध्ये खूप वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटल्याचेही आठवण त्यांनी आवर्जून नमूद केले. शिवेंद्रसिंह राजे यांनी स्वतः मी आपल्या लेखणीचा चाहता असल्याचे सांगितले हा संदर्भ त्यांनी अधोरेखित केला आणि तोच योगायोग आज या साताऱ्याच्या साहित्य संमेलनाने जुळवून आणला आहे. गाव गाड्यांमध्ये पाटील-कुलकर्णी ही जोडगोळी वेगवेगळ्या कामांसाठी प्रसिद्ध असते. पाटील हा तमाशाच्या फडात उसाच्या फडात असतो अशा गावगाड्यातल्या आठवणी असतात पण हा पाटील फक्त शब्दांच्या फडांमध्ये रमला आणि त्याच्यातूनच साहित्य निर्मिती झाली. जागरूकपणे लेखक विषय व आशय शोधत असतो ते अनुभव तो शब्दातून मांडत असतो एखाद्या विषयाची संवेदना वस्तुस्थिती पूर्ण पणे मांडताना सामाजिक भानं बाळगावे लागते. सकस अनुभवांची स्पंदने अचूकरित्या टिपली असता उत्कृष्ट साहित्य निर्मिती होते. त्याचे भान बाळगल्यामुळेच आपल्याकडून सरस्वतीची गेली चार दशके सेवा घडल्याचे विश्वास पाटील यांनी प्रामाणिकपणे नमूद केले.
साताऱ्यामध्ये वाघिणीची बाळंतपणे करणारे शूरवीर
साताऱ्यामध्ये वाघिणीची बाळंतपणे करणारे शूरवीर आहेत असे सांगत विश्वास पाटलांनी सर्व श्रोत्यांना धक्का दिला द ग्रेट कांचना सर्कस या पुस्तकात सर्कशीच्या निमित्ताने देश विदेश च्या दौऱ्यावर राहणाऱ्या साताऱ्यातील काही वयोवृद्ध सर्कशीतील कलाकारांचा शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .हे सर्व कलाकार पाली तालुका कराड येथील असल्याचे पाटील यांनी सांगत त्यांच्या ग्रेट कंचना सर्कस पुस्तकाच्या निमित्ताने मी मुलाखती घेतल्या तेव्हा प्राण्यांची निगा राखताना वाघिणीचे बाळांतपण केल्याचे किसे समोर आले असे सांगितल्यावर सगळेच अवाक झाले.
विश्वास पाटील हे सकस साहित्य आणि अनुभवानी संपन्न व्यक्तिमत्व
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजा दीक्षित म्हणाले, विश्वास पाटील हे सकस साहित्य आणि अनुभवानी संपन्न व्यक्तिमत्व आहे.साहित्य निर्मिती करताना त्याचा रसस्वाद देण्याकरता शब्द सामर्थ्य आणि सामाजिक अवधानं आवश्यक असते ही दोन्ही अवधाने पाटलांनी व्यवस्थित बाळगले आहेत साहित्य संमेलने आले की वादावादी ही सुरू होते आणि ती व्हावी अशा चर्चांमधून साहित्य निर्मितीला प्रोत्साहन आणि जर शब्द चळवळीला बळ मिळत असेल तर या गोष्टी घडणे नवलाईची गोष्ट नाही .विश्वास पाटील यांची साताऱ्याच्या साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दीक्षित यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दीक्षित यांच्या हस्ते विश्वास पाटील यांचा शाल श्रीफळ कंदीपेढ्याचा हार व जाहीर मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.