सातारा : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले. या घटनेने सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राजकीय सन्नाटा पसरला असून सर्व पक्ष नेत्यांनी थेट बारामतीकडे धाव घेतली आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी अजितदादा गटाचा चेहराच हरपल्याने कार्यकर्त्यांना पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने भारताचा तिरंगा ध्वज अर्ध्यावर उतरवला असून तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकांची धावपळ आणि प्रचार निर्णायक टप्प्यामध्ये असताना मंगळवारची सकाळ ही अचानक अजित दादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या बातमीने उजाडली आणि जिल्ह्याच्या राजकारणाला जोरदार धक्का बसला .सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर अजित दादा पवार यांची विलक्षण पकड होती सातारा जिल्ह्याच्या विकासाला भरभरून निधी देणारे म्हणून दादांची विशेष ओळख होती .दादांच्या निधनाच्या बातमीने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात विलक्षण शांतता पसरली .कार्यकर्त्यांना ही बातमी ऐकताच आपले अश्रू आवरले नाही .मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन काका पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले खासदार उदयनराजे भोसले हे तातडीने अजितदादांच्या निधनाचे वृत्त कळताच बारामतीला रवाना झाले .सातारा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अजित दादा पवार व शरद पवार राष्ट्रवादी या दोन्ही राष्ट्रवादीने राजकीय समीकरणे जुळवत एकत्र लढण्याला प्राधान्य दिले होते .या संदर्भात अजित दादा पवार यांनी बारामती येथे शरद पवार यांची भेट घेऊन एकत्रित लढण्याच्या संदर्भात निर्णय घेतला होता .जिल्हा परिषदेची लढाई अटीतटीची सुरू असताना अचानकच अजित दादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताची बातमी आल्याने कार्यकर्त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही. अजितदादा पवारांच्या एका समर्थकाने संगम माहुली येथील कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांच्या वतीने अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने रहिमतपूर येथे अजित दादा पवार यांनी घेतलेली सभा ही शेवटची सभा ठरली. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप 17 मध्ये पण अजित दादा येणार होते. मात्र राजकीय व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाहीत.औंध येथील जाहीर कार्यक्रमांना मात्र अजितदादांनी जाहीर उपस्थिती दर्शवली.राष्ट्रवादीचे नेते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे अजित दादांच्या सभेचे वाईमध्ये नियोजन सुरू होते मात्र तत्पूर्वीच दादांची अकाली एक्झिट झाल्याने राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना जोरदार धक्का बसला आहे. जिल्हा प्रशासनाने सातारा राष्ट्रीय ध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवत तीन दिवसाचा दुखावटा जाहीर केला आहे तसेच सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.