सातारा : राष्ट्रीय महामार्गावर काशीळ (ता. सातारा) येथे दि. १९ रोजी सकाळी साडेनऊ च्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये एकाचा जागीच जीव गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या काशीळकरांनी महामार्ग रोखला. महामार्ग सहापदरीकरणाच्या ठेकेदार अदानी कंपनीचा पोट ठेकेदार डी. पी. जैन कंपनीच्या बेशिस्त नियोजनावर आगपाखड करत अपुऱ्या वाहतुक नियोजनामुळेच एकाचा जीव गेल्याचा आरोप केला.
दि. १४ रोजी एका बियाणे कंपनीचा माल झारखंड येथे भरून निघालेला ट्रक क्र (जे. एच. ०२ बी. टी. ३०३८ ) यवतमाळ ,पुणे, सातारा येथे खाली करत काशीळ येथे दि. १९ रोजी पोहोचला. त्यातील काही माल काशीळ येथील एका विक्रेत्याकडे उतरवुन तो मालट्रक कोल्हापूरला जाणार होता. काशीळ येथे आल्यानंतर ट्रक बाजुला घेऊन दुकानाचा पत्ता विचारण्यासाठी ट्रकचा चालक सनोज लोचन यादव (रा. साल्वे चतरा झारखंड) हा खाली उतरत असतानाच पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने क्र (टी एन ९० एल २७६६) यादव यांच्या ट्रकच्या दरवाजाला जोराची धडक दिली. त्यामुळे यादव हा खाली पडून ट्रकच्या चाकाखाली आला. ट्रक अंगावरून पुढे गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पुढे जाvuवून हा ट्रक टेंपो क्र (एम. एच. १४ जे. एल. ९४६५) ला धडक देऊन थांबला. याप्रसंगाने काशीळ येथील ग्रामस्थ आक्रमक झाले व उपस्थितांनी महामार्ग रोखला.
काशीळकरांनी महामार्ग रोखल्यानंतर बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि वाळवेकर, सहा. फौजदार काझी, नावडकर, कदम , संजय जाधव हे तात्काळ घटनास्थळी पेाहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना बोलावून घेतले. त्यावेळी काशीळ ग्रामपंचायतीच्या वतीने अडी-अडचणींचे निवेदन दिले. जवळपास पाऊणतासानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली.