टीम इंडियाचा पराभव ; 'पावसाळी' पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट्सने विजय

by Team Satara Today | published on : 19 October 2025


पर्थ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेची सुरुवात भारतासाठी निराशाजनक ठरली आहे. पावसाच्या व्यातयामुळे पर्थ वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर 7 विकेट्सने सहज विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

भारताची टॉप ऑर्डर आजच्या मॅचमध्ये गडगडली. भारतानं पहिल्या चार विकेट 50 धावांच्या आत गमावल्या. विराट कोहलीला खातं उघडता आलं नाही. तर रोहित शर्मा 8 धावा करुन बाद झाला. यानंतर शुभमन गिल 10 आणि श्रेयस अय्यर 11 धावा करुन बाद झाला. टॉप ऑर्डर अपयशी ठरल्यानं  त्याचा दबाव इतर फलंदाजांवर आला. के एल राहुलनं 38 धावा आणि अक्षर पटेल यानं 31 धावा केल्या. यामुळं भारताचा डाव थोडा सावरला. मात्र, भारत मोठी धावसंख्या उभारु शकला नाही.

पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर वारंवार पावसामुळे डकवर्थ-लुईस नियम लागू करण्यात आला. सामना ५० ऐवजी २६-२६ षटकांचा ठरवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करत 136/9 अशी धावसंख्या उभारली. DL नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 131 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

पहिल्या 50 धावांमध्येच 4 विकेट्स पडल्याने संघ संकटात सापडला. अखेरीस के.एल. राहुल (38) आणि अक्षर पटेल (31) यांनी थोडी लढत देत डाव उभा केला.

सुमारे 224 दिवसांनंतर संघात परतलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु नेट सरावापुरतेच मर्यादित राहिल्याने दोघांनाही लय साधता आली नाही. काही तज्ज्ञांच्या मते, सराव सामन्यांचा अभाव टीम इंडियाला महागात पडला.

कर्णधार शुभमन गिल पुन्हा टॉसमध्ये अपयशी ठरला — सलग सातवा टॉस भारताने गमावला. पावसाचा परिणाम आणि ओव्हर कपात यामुळे पहिल्या गोलंदाजीचा मोठा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संमेलनाचा ब्रॅण्ड जगभरात पोहचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया
पुढील बातमी
साताऱ्यात जल्लोष पर्वाला आजपासून सुरुवात; पहिल्या अभ्यंग स्नानासाठी सातारा सज्ज

संबंधित बातम्या