कराड, दि. 10 : घराचे बांधकाम सुरू असताना, टाकलेला कचरा अंगावर पडल्याच्या कारणावरून सुमंगलनगर-गोळेश्वर, ता. कराड येथे मंगळवारी (दि. 9) दुपारी दोन गटांमध्ये तलवारी व कोयत्याने तुंबळ मारामारी झाली. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादींवरून दोन्ही गटांमधील 12 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
गफार अल्लाबक्ष मुल्ला (वय 32) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमर अस्लम मोमीन, अरफान फिरोज मोमीन, फिरोज रज्जाक मोमीन, अमानुल्ला रज्जाक मोमीन, आफताब अमानुल्ला मोमीन, अस्लम रज्जाक मोमीन, समीना मोमीन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गफार मुल्ला यांच्या घराच्या तिसर्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू असताना, तेथून टाकलेला कचरा फिरोज मोमीन यांच्या अंगावर पडला. त्याचा राग येऊन, फिरोज यांचा पुतण्या उमर व अन्य संशयित तेथे आले. उमरच्या हातात तलवार होती. संशयितांनी गफार मुल्ला यांच्या दंडावर तलवारीने वार करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याउलट उमर अस्लम मोमीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अल्लाबक्ष आमीन मुल्ला, इरफान अल्लाबक्ष मुल्ला, गफ्फार अल्लाबक्ष मुल्ला, जुबेर अल्लाबक्ष मुल्ला, इम्रान अल्लाबक्ष मुल्ला यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अंगावर कचरा का टाकला, याचा जाब विचारल्याने, संशयितांनी कोयत्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यात उमर मोमीन हे जखमी झाले आहेत.