सातारा : दुष्काळसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची जादा मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे उघडून सिंचनासाठी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आठ दिवसांत पाणी विसर्गात वाढ झाली आहे. सध्या सांगली जिल्ह्यासाठी एकूण ३ हजार ९८३ क्यूसेक विसर्ग केला जात आहे.
साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही यंदा मान्सूनचा पाऊस कमी झालेला आहे. यामुळे याचा परिणाम खरीप हंगामावर झाला आहे. तसेच परतीच्या पावसाचाही भरवसा नाही. पाऊस कमी झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. त्यापूर्वीच पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. यामुळे धरणांतून विसर्ग करावा लागतोय. सातारा जिल्ह्यात कोयना धरण आहे. या धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. एल निनोच्या संकटातही हे धरण भरले. पण, सध्या या धरणातून विसर्गासाठी पाणी सोडण्याची वेळ सप्टेंबर महिन्यातच आलेली आहे. कारण, सांगली पाटबंधारे विभागाकडून काेयनेतून पाणी मागणीत वाढ झालेली आहे. त्यानुसार कोयनेतून विसर्ग वाढविण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले आहेत.
सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी मागील आठवड्यात पायथा वीजगृहातून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग करण्यात आला. त्यानंतर मागणी वाढली. त्यामुळे सोमवारी सकाळी धरणाचे दोन वक्र दरवाजे एक फुटाने वर उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून २ हजार ९३३ आणि पायथा वीजगृह १ हजार ५० असा एकूण ३ हजार ९८३ क्यूसेक विसर्ग सुरू झालेला आहे. हे पाणी सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी जात आहे. कोयना धरणातील पाण्यावरच सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन पाणी योजना अवलंबून आहेत. परतीचा पाऊस कमी झाल्यास सांगली पाटबंधारे विभागाकडून आणखी पाणी मागणी वाढू शकते.
दुष्काळसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगलीची पाण्याची मागणी वाढल्याने सप्टेंबरमध्येच कोयनेचे दरवाजे विसर्गासाठी उघडले
by Team Satara Today | published on : 22 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा