मुलीच्या जन्माचे स्वागत हीच सामाजिक समता: विस्तार अधिकारी, प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर

by Team Satara Today | published on : 15 October 2025


वडूज :  "मुलीच्या जन्माचे स्वागत करणे हे स्त्री पुरुष समानतेचे प्रतीक आहे.भारतीय स्त्री हा यशस्वी भारतीय समाजाचा सांस्कृतिक आणि सामाजिक पाया आहे", असे प्रतिपादन खटाव पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे  विस्तार अधिकारी आणि प्रसिद्ध वक्ते यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.

पोषण महिन्याच्या खटाव तालुक्यातील मायणी येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी  सरपंच सोनाली माने,पर्यवेक्षिका स्वप्नाली मेढेकर, पर्यवेक्षिका एस.व्ही. इनामदार, पर्यवेक्षिका पूजा गायकवाड, कार्यालयीन सहाय्यक मंगेश लोखंडे उपस्थित होते. मुलीच्या जन्माचे स्वागत यावेळी उत्साहात करण्यात आले.

श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले," २०१८ पासून पोषण महिना साजरा केला जातो. बालक, गरोदर महिला ,स्तनदा माता तसेच कुटुंबातील सर्वच घटकांनी योग्य आहार घेतल्यास सुदृढ आरोग्य प्राप्त होईल व त्यातूनच मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सशक्त भारताची निर्मिती होण्यास हातभार लागेल. या ध्येयप्राप्तीमध्ये कुटुंबातील एक जबाबदार महत्त्वाचा घटक म्हणून स्त्रियांबरोबरच पुरुषांनीही सहभाग घ्यावा. "स्वस्थ नारी सशक्त परिवार", "धाराऊ योजना", "लेक लाडकी योजना" अशा अनेक योजना राबवत असताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आटोकाट प्रयत्न करीत असतात. त्यासाठी गावातील प्रत्येक घटकाने सहकार्य करावे. या योजनेची यशस्वीता केवळ प्रशासनावर अवलंबून नसून समाजाच्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे.

सिंधुताई सपकाळ, मदर तेरेसा ,साधना आमटे ,अनुताई वाघ अशा अनेक कर्तबगार स्त्रियांची परंपरा भारताला आहे. ही परंपरा भारतीय स्त्री अजूनही प्राणपणाने जपत आहे." निरोगी शरीरात निरोगी मन वसते" हे सर्वांनी ध्यानी घ्यावे."अंगणवाडी पर्यवेक्षिका पूजा गायकवाड तसेच एस. व्ही.इनामदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या आणि बक्षीस वितरण करण्यात आले. मायणी बीटच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका स्वप्नाली मेढेकर यांनी प्रास्ताविक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेनेचा भगवा फडकवत कार्यकर्त्यांना ताकद द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन; निवडणुकांत महायुतीचा वरचष्मा राहिला पाहिजे
पुढील बातमी
सातारा भूषण ; सद्गुणांचा महामेरू, बहुजनांचा आधारू ॥ श्रीमंतयोगी अरुणकाका॥ - जेष्ठ पत्रकार शरद महाजनी

संबंधित बातम्या