मेढा : कुडाळ-मेढा मार्गावर करंदोशी गावाजवळ आज दुपारी रोडचे काम सुरू असताना अपघाताची घटना घडली. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या पाण्याच्या टँकर वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, दुचाकीस्वार टँकरच्या जवळून जात असताना वाहनाच्या धडकेने दुचाकी टँकरच्या चाकाजवळ अडकली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमीला उपचारासाठी हलविले.
अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून,पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, रस्त्याचे काम सुरू असताना योग्य ती सुरक्षा उपाययोजना व सूचना फलक लावणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.