विधी सेवा प्राधिकरणामार्फत माहिती अधिकार कायदा-2005च्या जनजागृतीसाठी कार्यशाळा

by Team Satara Today | published on : 11 February 2025


सातारा : दैनंदिन कार्यालयीन कामकाजामध्ये सातारा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विभागात माहिती अधिकार अधिनियम -2005 अंतर्गत विविध अर्ज प्राप्त होत असतात. या माहिती अधिकार अर्जांच्या अनुषंगाने अर्जदारास वेळीवेळी विविध प्रकारची माहिती द्यावी लागते. सदर माहिती देताना अधिकारी व कर्मचारी यांना सुलभता व्हावी व माहिती अधिकार अधिनियम -2005 अंतर्गत कोणतीही अडचण येऊ नये हा उद्देश ठेवून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा परिषद, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील विविध विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांचेसाठी कार्यशाळा छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, सातारा जिल्हा परिषद, सातारा येथे आज दि.11 फेब्रुवारी 2025 रोजी 11.30 वाजता संपन्न झाली.

या कार्यशाळेमध्ये श्रीमती निना बेदरकर, सचिव, जिल्हा सेवा प्राधिकरण, सातारा व शिवाजी राऊत, महात्मा गांधी स्मारक समिती अध्यक्ष, सातारा यांनी कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार अधिनियम-2005 अंतर्गत येणाऱ्या सर्व कलमांचा परिचय करुन दिला. तसेच माहिती अधिकार कायद्याची व्याप्ती, महत्व व उपयोगिता याबाबत अनमोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे माहिती अधिकार कायद्याच्या अनुषंगाने विविध अर्जावर करावयाची कार्यवाही, अर्जाबाबतची कालमर्यादा, दंडात्मक कारवाई तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या माहितीचे स्वरुप याबाबतचे सविस्तर विश्लेषण केले.

कार्यशाळेमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जावर कार्यवाही करताना निश्चितच फायदा होईल, असे मत निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), सातारा जिल्हा परिषद सातारा यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील जनमाहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाचे काम राजेंद्र पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, सातारा जिल्हा परिषद, सातारा यांनी केले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महापुरुषांच्या अवमानाबाबत कठोर कायदा करा
पुढील बातमी
नोकरीच्या आमिषाने लोकांची फसवणूक करणारा ठग जेरबंद

संबंधित बातम्या