बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआचे आंदोलन

सरकार असंवेदशील असल्याचा आरोप; गृहविभागाच्या कारभाराबाबत नाराजी

by Team Satara Today | published on : 24 August 2024


सातारा : राज्यात बदलापूर व अन्य ठिकाणी झालेल्या महिला व बालिका अत्याचार प्रकरणाचा महाविकास आघाडीतर्फे शनिवारी जोरदार निषेध करण्यात आला. सातारा येथील पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मूक आंदोलन केले. राज्य सरकार असंवेदनशील असून गृहविभागाच्या कारभाराबाबत यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व आंदोलकांनी तोंडाला काळया पट्ट्या बांधल्या होत्या. राज्यातील महायुती सरकारला लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात पूर्णपणे अपयश आले असून या सरकारचा जाहीर निषेध अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, राज्यात घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन केले. राज्यात लहान मुलींवर अत्याचार होत आहेत\ रोज नवीन प्रकार उघडकीस येत आहेत. राज्याच्या गृह खात्याचे या घटनांवर नियंत्रण राहिलेले नाही.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)  पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले, राज्यामध्ये महिलांवरील अत्याचारच घटना सातत्याने घडत आहेत.  या घटना माणुसकीला काळमा फासणारे आहेत. बदलापूरच्या घटनेमध्ये पालकांनी आवाज उठवल्यानंतर पोलीसच त्यांच्या आवाज दाबत होते. हा प्रकार अतिशय निंदनीय असून सरकारने अशा घटनांमध्ये तरी गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.
शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे - पाटील म्हणाले, बदलापूर सोबतच कोल्हापूर, नागपूर, अकोला, पुणे या जिल्ह्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. राज्यातील सरकार अशा घटना हाताळताना संवेदनशीलपणा दाखवत नाही. अशा घटनां विरोधात आवाज उठवायचा झाला तर आंदोलनाला परवानगी नाकारली जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या वतीने राज्यातील महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे.
या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, काँग्रेसच्या धनश्री महाडिक, नरेश देसाइ,  विजय बोबडे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड शहर परिसरात पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन
पुढील बातमी
पोक्सो प्रकरणी एकावर गुन्हा 

संबंधित बातम्या