म्हसवड : पानवण, ता. माण गावच्या हद्दीत अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्या दोघांचा पाठलाग करून पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून वाळू, ट्रॅक्टर, ट्रॉली असा 7 लाख 28 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनोहर जगन्नाथ जंगम आणि सयाजी पंढरीनाथ कुंभार अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.
माण नदी पात्रासह परिसरातील ओढ्यातील राजरोसपणे वाळू चोरी प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्री गस्त घालणे सुरु केले आहे. पानवण येथील ओढ्यातून वाळू चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून वाळू, ट्रॅक्टर, ट्रॉली असा मुद्देमाल जप्त केला आहे. सपोनि अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, देवानंद खाडे, अमर नारनवर, सतीश जाधव, योगेश सूर्यवंशी, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे यांनी ही कारवाई केली.