सातारा : सातारा जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होत असून घाटमाथा आणि डोंगराळ भागात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी रस्ते घसरडे झाले असून दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नद्या, ओढे आणि धरणांतील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बुधवारी जिल्ह्यात सरासरी ३०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील एकूण सरासरी पर्जन्यमान २३८.२ मि.मी.वर पोहोचले आहे. महाबळेश्वर येथे सर्वाधिक १७४.४ मि.मी. पाऊस झाला, तर जावली (मेढा) येथे १०५ मि.मी. पावसाची नोंद झाली. वाईमध्ये ३७.२, सातारा २९.८, पाटण २८.७, खंडाळा २२.७, कोरेगाव २१.५, कराड १६.२, खटाव १२, फलटण ७.४ आणि माण तालुक्यात ३.६ मि.मी. पाऊस झाला.
मुसळधार पावसामुळे भालेघर–आखाडे मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कास–बामणोली–तापोळा–महाबळेश्वर मार्गावरील सुमारे ५० मीटर रस्त्याचा काही भाग घसरल्याने तो धोकादायक बनला आहे. तसेच पाटण तालुक्यातील खुडूपलेवाडी–गावडेवाडी मार्गावरही दरड हटविणे आणि नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात ७९,७०८ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. धरणातील एकूण पाणीसाठा ४४.५७ टीएमसी (४२.३५ टक्के) असून उपयुक्त पाणीसाठा ३९.४५ टीएमसी (३९.४० टक्के) इतका झाला आहे. धरणाची पाणीपातळी २१०१ फूट झाली असून सध्या धरणातून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
कोयना येथे ६५ मि.मी., नवजा येथे ६३ मि.मी. आणि महाबळेश्वर येथे ८७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, पावसामुळे वीर धरणातून सायंकाळी सहा वाजल्यापासून निरा नदीपात्रात ६,०३७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे आणि मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच घाटरस्त्यांवर प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पुढील २४ तासांतही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.