सातारा : मे महाराष्ट्र दिनानिमित्त विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि नृत्यांजली नृत्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सांख्य डान्स कंपनी मुंबई व सहकलाकार यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावर आधारित सादर केलेल्या 'श्रीमंत योगी' या भव्य नृत्यनाट्याने सातारकर रसिक मंत्रमुग्ध झाले.
सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यावर्धिनीच्या अध्यक्षा श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नृत्यांजली संस्थेच्या संस्थापिका सौ.वैशाली पारसनीस, सांख्य डान्स कंपनीचे कलात्मक संचालक वैभव आरेकर व सुशांत जाधव हे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना नृत्यांजलीच्या संस्थापिका सौ वैशाली पारसनीस यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली.
सौ. वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट शैक्षणिक विकास, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. विविध कलागुणांचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व व गरज ओळखून शालेय शिक्षणाबरोबर विविध कलागुणांचे भावी पिढीवर संस्कार झाले पाहिजेत.
कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांजलीच्या ज्येष्ठ शिष्यांनी सादर केलेल्या 'गणपती तालम'ने झाली. नृत्य संरचना गायत्री जोशी आणि सायली कुलकर्णी यांनी केली, पल्लवी सहस्त्रबुद्धे, विभावरी गोडबोले, अनुजा बोकील, श्रुती कडूसकर, सायली शेणोलीकर आणि गायत्री जोशी सहभागी झाल्या होत्या.
'सांख्य' द्वारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सांस्कृतिक, सामाजिक व भावनिक स्थिती, शिवचरित्र या नृत्याच्या माध्यमातून प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आले. शिवरायांचा जन्म, स्वराज्याची प्रतिज्ञा, अन्याय, अत्याचाराविरुद्ध विरुद्ध लढा, हिंदवी स्वराज्याची स्थापना, अंतर्गत अध्यात्मिक संघर्ष, राज्याभिषेक हे प्रसंग नृत्याच्या माध्यमातून तसेच वेशभूषा, प्रकाश रचना, संगीत यांचा प्रभावीपणे व ताकतीने वापर करून वैभव आरेकर व सुशांत जाधव व सहकलाकारांनी सादरीकरण केले. सौ चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास श्री पारसनीस, डॉ.समीर सोहनी, उद्योजक शिरीष खुटाळे, डॉ अनंत निमकर, जयंत देशपांडे आदी मान्यवरांसह नृत्यकला गणशिष्य, शिवप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.