‘२८ तारखेपर्यंत ठोस निर्णय घ्या, नाहीतर...’ मराठा आरक्षणावरून आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

by Team Satara Today | published on : 20 August 2026


वडीगोद्री : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २९ ऑगस्टची अंतिम मुदत देत अंतरवाली सराटी येथे मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाला आतापर्यंत सरकारने केवळ आश्वासने आणि ‘चॉकलेट’ दिले; मात्र आरक्षणाच्या प्रश्नावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला. अंतरवाली सराटी येथे गुरुवारी सायंकाळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाज आता आरक्षणाच्या प्रश्नावर शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपला आहे. गोरगरीब मराठा समाजासाठी आपण पुन्हा एकदा आंदोलन उभे करणार असून, हे आपले शेवटचे आंदोलन असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘२८ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या’

मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्यावरूनही जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने कुणबी प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू केली; मात्र आता काही प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. गोरगरीब समाजाच्या परिस्थितीची जाणीव सरकारला असायला हवी होती. प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई सुरू केल्यास त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. ‘सरकारला २८ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय घेण्याची संधी आहे. या मुदतीत निर्णय झाला नाही, तर २९ ऑगस्टचे आंदोलन निश्चित आहे. त्यानंतरचे आंदोलन सरकारला झेपणार नाही,’ असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

‘बावनकुळे, शिरसाठ यांच्या माध्यमातून षडयंत्र’

कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्यावरून त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाठ यांच्यावरही निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बावनकुळे व शिरसाठ यांच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्रांच्या बाबतीत षडयंत्र रचल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई योग्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘गोरगरीबांच्या तळतळाटाला कारणीभूत होऊ नका. गरीब समाजाला दिलेला शब्द पाळणे ही सरकारची जबाबदारी आहे. प्रमाणपत्रे रद्द करण्याची कारवाई थांबवून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा,’ अशी मागणी त्यांनी केली.

‘संपूर्ण राज्यात सरकारविरोधात खदखद’

राज्यातील विविध घटकांमध्ये सरकारविरोधात नाराजी असल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी केला. शेतकरी, मुस्लिम, दलित, आदिवासी, ओबीसी यांच्यासह कोणताही घटक सध्या सुखी नसल्याचे ते म्हणाले. विविध प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, या नाराजीचा उद्रेक होण्यापूर्वी सरकारने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. ‘सरकारला आता ठिकाणावर आणण्यासाठी २९ ऑगस्ट निश्चित आहे. त्या दिवशी सरकारला जनतेची ताकद काय असते, हे कळेल,’ असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, २९ ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून तयारी सुरू झाली असून, सरकार या मुद्यावर कोणता निर्णय घेते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धनुष्यबाण चिन्ह गोठवणार?, दोन्ही सेनेच्या भांडणाचा फायदा...; वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

संबंधित बातम्या