रायगडावर बुधवारी ‘ऐतिहासिक शौर्य दिन’ सोहळा; छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी खंडेराव बर्गे यांना कोरेगावकर नागरिक करणार अभिवादन

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा : स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगड येथे बुधवार दि. १८ मार्च रोजी ऐतिहासिक शौर्य दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले रायगड तिसऱ्यांदा स्वराज्यात सामील झाल्याच्या ऐतिहासिक घटनेला यंदा तब्बल २५३ वर्षे पूर्ण होत असून, त्या पार्श्वभूमीवर कोरेगाव येथील श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने हा सोहळा साजरा केला जाणार आहे.

या ऐतिहासिक मोहिमेत कोरेगावचे समशेरबहाद्दर राजर्षी खंडेराव बर्गे यांनी अतुलनीय पराक्रम गाजवत स्वराज्याच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. त्या शौर्याला वंदन करण्यासाठी तसेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

श्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग सुतार आणि ज्येष्ठ विधिज्ञ चंद्रशेखर बर्गे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, किल्ले रायगड तिसऱ्यांदा स्वराज्यात आणण्यासाठी झालेल्या घनघोर लढाईत राजर्षी खंडेराव बर्गे यांनी अद्वितीय शौर्य दाखवले. या विजयाच्या निमित्ताने रायगडावरील राजसिंहासनासमोर सरदारांनी रुप्याची फुले उधळून आनंदोत्सव साजरा केला होता. त्या गौरवशाली क्षणाला २५३ वर्षे पूर्ण होत असल्याने हा सोहळा विशेष उत्साहात साजरा केला जाणार आहे.

या सोहळ्याला कोरेगाव परिसरातील बर्गे घराण्याचे सदस्य तसेच अठरापगड जातीतील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे भूषवणार आहेत.

यावेळी किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर राजसिंहासनासमोर भगवा ध्वज फडकावून स्वराज्याच्या परंपरेला अभिवादन केले जाईल. तसेच राजर्षी खंडेराव बर्गे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या शौर्याची आठवण जागवली जाणार आहे.

सोहळ्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेकडो कोरेगावकर नागरिकांकडून रायगड किल्ल्याचे दर्शन घेण्यात येणार असून, स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पवित्र स्थळाला अभिवादन केले जाणार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाकडे पोलिसांचे दुर्लक्ष; संतप्त निगडी रंगनाथ स्वामींची ग्रामस्थांचा इशारा : तपास न झाल्यास मोर्चा आत्मदहन

संबंधित बातम्या