महाबळेश्वरचाही पारा घसरला; स्थानिक आणि पर्यटक घेताहेत गुलाबी थंडीचा आनंद, शेत शिवारात थंडीचा कडाका

by Team Satara Today | published on : 19 November 2025


सातारा : राज्यातील थंड हवेचे पर्यटन स्थळ महाबळेश्वर थंडीने गारठले आहे. थंडीसोबतच बोचऱ्या वाऱ्यामुळे या कडाक्यात भर पडली आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकांना हुडहुडी भरली आहे. महाबळेश्वर, पाचगणीमध्ये किमान तापमानाची नोंद ११ अंश एवढी नोंदवली गेली आहे. पुढील काही दिवसांत हा पारा आणखी खाली येण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. शहरी भागापेक्षा सभोवतालच्या शेत शिवारात थंडीचा कडाका अधिक आहे.

महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक, लिंगमाळा परिसरामध्ये तापमान घटताना दिसत आहे. शहरालगतचे ढाबे, हॉटेलच्या बाहेर शेकोट्या, शेगड्या पेटू लागल्या आहेत. तसेच उबदार कपड्यांच्या खरेदीकडे पर्यटकांचा कल असल्याचे पाहावयास मिळत आहे.

महाबळेश्वर परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. थंडीचा कडाका वाढल्याने शहरासह परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरात ११ अंशापर्यंत तापमान घसरले आहे. दिवसा मात्र हेच तापमान १६ ते २१ अंशांपर्यंत जात आहे. कमाल तापमानही कमी राहत असल्याने दिवसभर थंडी वाजते. येथील प्रसिद्ध वेण्णालेक व लिंगमळा परिसरात हेच तापमान आणखी खाली येत असते. वेण्णालेक येथे तापमानाची नोंद घेण्याची यंत्रणा नसल्याने अडचण होत आहे. महाबळेश्वरमध्ये दिवसभर थंडी अनुभवावयास मिळत असून, सकाळी-सायंकाळी स्वेटर, शॉल्स, टोपीसारखी गरम वस्त्रे परिधान करून गुलाबी थंडीचा आनंद घेताना स्थानिक आणि पर्यटक दिसत आहेत. घरोघरी शेगड्या पेटल्या आहेत. यामुळे घरातील वातावरण उबदार राहते. थंडीच्या दिवसातही गरमागरम मका कणीस, चहा, भजीवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत. महाबळेश्वर, पाचगणी नजीकच्या वाई शहरातही पारा १२ अंशापर्यंत घसरला आहे.

साताऱ्यात १२ आणि सातारा शेजारच्या कास पठारावर मात्र ११ अंशापर्यंत नीचांकी तापमान नोंदविले जात आहे. घटलेल्या तापमानासह बोचऱ्या वाऱ्यामुळे या कडाक्यात भर पडली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यातील पारा हळूहळू कमी होत गेला. थंडीसोबतच बोचऱ्या वाऱ्यामुळे या कडाक्यात भर पडली आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांसह नागरिकांना हुडहुडी भरली आहे. पुढील काही दिवसांत हा पारा आणखी खाली येण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात प्रभाग 20 मध्ये आशा पंडित बिनविरोध ; भाजपचे जोरदार ओपनिंग
पुढील बातमी
सातारा विकास आघाडीच्या गोटात राजकीय सन्नाटा; नगराध्यक्षपदाच्या मानापमान नाट्याची नाराजी, खा. उदयनराजे यांच्या मनात आहे तरी काय ?

संबंधित बातम्या