सातारा : कारी, ता. सातारा येथे एका गर्भवती मातेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये महिला व एका तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला तर एक मुलगी सुदैवाने झुडपात अडकल्याने बचावली. ही घटना गुुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
श्रद्धा विशाल मोरे (वय 27) आणि स्पृहा विशाल मोरे (वय 3) अशी मृतांची, तर त्रिशा विशाल मोरे (वय 5) बचावलेल्या मुलीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबई येथे कामानिमित्त विशाल मोरे हे कुटुंबासह वास्तव्यास आहे. गणेशोत्सवासाठी ते गावी कारी येथे आले होते. शुक्रवारी हे कुटुंब मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, अदल्या दिवशी गुरुवारी दुपारी श्रद्धा मोरे या आत्महत्या करण्यासाठी मुलींसह विहिरीत उडी घेतली. या घटनेत त्यांच्यासह एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे श्रद्धा मोरे यांचे माहेर असलेल्या आरेदरे, ता. सातारा गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.