सातारा शहरातील अतिक्रमण हटले; आता रिक्षा थांब्यांना शिस्त लावा - सामाजिक कार्यकर्ते निलेश आपटे आणि अमर बेंद्रे यांची मागणी

by Team Satara Today | published on : 21 August 2026


सातारा : शहरातील रस्ते आणि चौक अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर वाहतुकीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, अतिक्रमणे हटविल्यानंतर निर्माण झालेली मोकळी जागा पुन्हा वाहतुकीच्या अडथळ्याचे केंद्र बनू नये, यासाठी रिक्षा थांब्यांचे शास्त्रशुद्ध नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील अनेक रिक्षा थांबे आजही जुन्या जागेवरच सुरू असल्याने रिक्षांची गर्दी, प्रवाशांची वर्दळ आणि अनियंत्रित पार्किंगमुळे वाहतुकीचा प्रश्न कायम आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश विलासराव आपटे आणि अमर वसंतराव बेंद्रे यांनी शहरातील रिक्षा थांब्यांचे नव्याने सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्नियोजन करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि शहर सुधार व नियोजन समितीचे सभापती अशोक शेडगे यांना निवेदन दिले आहे.

शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत करताना त्यांनी म्हटले आहे की, अनेक प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील अडथळे दूर झाल्याने वाहतुकीसाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे. मात्र, या सुधारणांचा अपेक्षित परिणाम साधायचा असेल तर रिक्षा थांबे आणि रिक्षांच्या पार्किंग व्यवस्थेकडेही पालिकेने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

शहरातील प्रत्येक रिक्षा थांब्याची सध्याची स्थिती तपासून त्याचे फेरसर्वेक्षण करण्यात यावे. संबंधित रस्त्याची रुंदी, वाहतुकीची तीव्रता, प्रवाशांची संख्या, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा तसेच महत्त्वाच्या चौकांचे स्वरूप लक्षात घेऊन रिक्षा थांब्यांची जागा निश्चित करावी. यासाठी सातारा पालिकेने वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने स्वतंत्र नियोजन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

विशिष्ट ठिकाणी रिक्षा उभ्या करण्यासाठी मर्यादित जागा निश्चित करून तेथे रिक्षांची शिस्तबद्ध रांग लावण्याची व्यवस्था केल्यास रस्त्यावर होणारी अस्ताव्यस्त पार्किंग कमी होऊ शकते. तसेच प्रवाशांना रिक्षा मिळण्याची सुविधा कायम ठेवून मुख्य वाहतूक मार्ग मोकळे ठेवणे शक्य होईल.

अतिक्रमण हटाव मोहिमेपुरतीच वाहतूक सुधारणा मर्यादित न ठेवता त्यानंतरच्या व्यवस्थेचेही नियोजन करणे आवश्यक आहे. रिक्षा थांब्यांचे पुनर्नियोजन झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच रिक्षाचालक, वाहनचालक आणि नागरिक यांच्यातील वादाचे प्रसंगही कमी होतील. त्यामुळे अतिक्रमणमुक्त सातार्‍याची ही मोहीम अधिक परिणामकारक करण्यासाठी रिक्षा थांब्यांचे नियोजन तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी आपटे आणि बेंद्रे यांनी केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम शांतता बैठक; आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या नियोजनाबाबत पोलिसांचे मार्गदर्शन
पुढील बातमी
चारित्र्याच्या संशयावरून कराडमध्ये महिलेचा निर्घृण खून; संशयित प्रियकर पोलिसांत हजर

संबंधित बातम्या