सातारा, दि. १४ : करंजखोप येथील शंभुराज खामकर यांना व्यवसायासाठी दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून २३.७५ लाख रुपये स्वीकारून फसवणूक करणारा आरोपी राजेंद्र विष्णू काकडे (वय ५५, रा. साईनगरी, शाहूनगर, गोडोली, सातारा) यास वाठार पोलिसांनी अटक केली.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंभूराज दिलीप खामकर (रा. करंजखोप, ता. कोरेगाव सध्या रा. मार्केट यार्ड रोड, आदर्श नगर, पुणे) यांचा पुणे येथे शेअर बाजार शिकवणी क्लासचा व्यवसाय आहे. खामकर यांना व्यवसाय वाढीसाठी दीड कोटी रुपयांची आवश्यकता होती. याविषयी करंजखोप येथील खामकर यांचा मित्र मयूर धुमाळ याच्याशी कर्जाविषयी चर्चा केली. यावेळी मयूर धुमाळ याने वाठार स्टेशन येथील मनोज कलापट व आदर्की खुर्द येथील सुरेश निंबाळकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.
दरम्यान कलापट व निंबाळकर यांनी दीड कोटींच्या कर्ज प्रकरणासाठी राजेंद्र काकडे यांच्या शाहूनगर गोडोली येथील जीवनधारा अर्थसहाय्य प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी संस्थेत घेऊन गेले व खामकर यांची राजेंद्र काकडे यांच्याशी ओळख करून दिली. काकडे याने दीड कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून कर्ज प्रक्रियेसाठी खामकर यांच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून टप्प्याटप्प्याने एकूण २३ लाख ७५ हजार रुपये घेतले. कर्ज प्रकरण होत नसल्याचे खामकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी काकडे यांच्याकडे दिलेल्या पैशासाठी तगादा लावला. यावेळी काकडे याने खामकर यांना ८ लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम न मिळाल्याने खामकर यांनी काकडे याच्याविरुद्ध वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
१७ फेब्रुवारी २०२५ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी काकडे हा तब्बल सहा महिने दिल्लीतील विविध ठिकाणी लपून बसला होता. मोबाईल वरून प्राप्त झालेल्या लोकेशन नुसार जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरामध्ये त्याचा शोध घेतला होता. परंतु, संशयित लोकेशनवर मिळून येत नव्हता. त्याचा शोध घेण्यामध्ये अडचणी येत होत्या. तो सातारा परिसरात परतल्याची माहिती मिळताच वाठार पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच सातारा शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्त कारवाई करत त्याला १३ सप्टेंबर रोजी त्याच्या घरून ताब्यात घेतले. रविवार, दि. १४ सप्टेंबर रोजी कोरेगाव यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे