सातारा : महिंद्रा थार गाडीच्या विक्रीचे आमिष दाखवून, विविध ठिकाणच्या नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्या युवराज जाधव (रा. प्रतापसिंहनगर, खेड) या भामट्याला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले आहे. युवराजला साथ देणारी त्याची पत्नी रुख्साना आणि मोहित मिनेकर यांनाही अटक करण्यात आली असून, थार गाडी जप्त करण्यात आली आहे.
लग्नासाठी महिंद्रा थार गाडी हवी असल्याचे सांगून, युवराजने फिर्यादीकडून गाडी दि. 2 एप्रिल रोजी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून ताब्यात घेतली. गाडी परत देण्यास टाळाटाळ होत असल्याने, फिर्यादीने काही दिवसांनी चौकशी केली असता, ती गाडी कोल्हापूरमध्ये एका व्यक्तीकडे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात घोटाळा उघड झाला. थार गाडीची कमी किमतीत विक्रीची खोटी ऑफर विविध जिल्ह्यांमध्ये देऊन, बनावट कागदपत्रे तयार करत, ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेणे. गाडी विकून, जीपीएस ट्रॅकरद्वारे गाडीचे लोकेशन मिळवणे. रात्री अपरात्री तीच गाडी बनावट चावीने चोरणे, अशी पद्धत वापरून, युवराजने कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले. युवराज जाधव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर कोल्हापूरमध्ये लक्ष्मीपुरी, शाहूवाडी, विटा (जि. सांगली) आदी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सातारा, कोल्हापूर, सांगली, निपाणी, गडहिंग्लज, चिकोडी अशा अनेक ठिकाणी दोन महिने गाडीचा माग काढला. थार गाडी आजरा (जि. कोल्हापूर) येथे एका शेडमध्ये लपवलेली सापडली. पोलिसांनी गाडी जप्त केली. मात्र, युवराज जाधव हा राहण्याची ठिकाणे सतत बदलत होता. त्याला पत्नी रुख्साना हिची साथ असल्याच्या संशयामुळे तिच्या हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते. अखेर पाचगाव (ता. करवीर) येथून युवराजला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजीत भोसले, नीलेश यादव, नीलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडू, पंकज मोहिते, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे यांनी ही कारवाई केली.