सातारा : साताऱ्यातील ऐतिहासिक गोडोली तळे येथे करण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य दिव्य स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या स्मारकाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी केली आहे.
साताऱ्यातील ऐतिहासिक गोडोली तळे येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा 25 फूट उंच भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांची व तयारीची पाहणी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या सुचनेनुसार स्मारक समितीच्यावतीने सोमवारी करण्यात आली. यावेळी स्मारक समितीचे उपाध्यक्ष व पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, सदस्य उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, संग्राम बर्गे, विलास शिंदे, अभिजीत बारटक्के, ईर्शाद बागवान प्रमुख उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होत असलेल्या गोडोली तळ्याचे सुशोभिकरण करण्यात आले असून त्याठिकाणी 25 फूट उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळ्यासाठी 12 फूट उंच चबुतरा बांधण्यात आला आहे. उर्वरित कामाचे नियोजन सुरू आहे. पुतळा तयार करण्याचे काम पुण्यातील एजन्सी करत आहे. पुतळा बसवण्याच्या कामास 15 ते 20 दिवसांत प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे. स्थापत्य विशारदाच्या सल्ल्यानुसार स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेऊन कामास सुरूवात करण्यात येणार आहे. या कामासाठी आवश्यक इतर सरकारी परवानग्या घेण्यात आल्या आहेत. स्मारक परिसरात आवश्यकतेनुसार विद्युत रोषणाई करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात स्मारक समितीचे अध्यक्ष खा. उदयनराजे भोसले यांच्यासोबत समिती सदस्यांकडून चर्चा करण्यात आली. दरम्यान, आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. हरीष पाटणे म्हणाले, इचलकरंजी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे अनावरण केले होते. स्मारक समितीसोबत चर्चा करून पुतळा अनावरण कार्यक्रम हा भव्य दिव्य करावा. मिरवणुकीत शिवशंभू भेट अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याविषयी त्यांनी सूचना केली.