धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार : अभिजित दिपके यांचा इशारा, कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर-मंतरवर आंदोलन

by Team Satara Today | published on : 20 June 2026


नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचे शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन झाले. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीतील हे दुसरे आंदोलन होते. प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा 'कॉजपा'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी यावेळी दिला. सरकारसोबत चर्चा करायला तयार असल्याचे दिपके यांनी सांगितले. सरकारसोबतच्या चर्चेसाठी दिल्ली पोलिसांनी पुढाकार घेत भूमिका बजावावी, असे त्यांनी म्हटले. या आंदोलनात सोनम वांगचूक यांनी देखील आंदोलकांना संबोधित केले. 

आंदोलन दुपारी एक वाजता सुरू होणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले होते. मात्र, आंदोलक १ वाजताच्या अगोदरपासूनच आंदोलनस्थळी जमा झाले. ६ जूनच्या आंदोलनापेक्षा यावेळी आंदोलकांची गर्दी जास्त होती. अभिजीत दिपके काही मोजक्या सहकाऱ्यांसह दुपारी दोन वाजताच्या सुमारास आंदोलन स्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातात महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणली होती. सुरुवातीलाच त्यांनी सर्व आंदोलकांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले. 

सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्यास दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेंना परवानगी दिली होती. ही वेळ वाढवून रविवारपर्यंत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आंदोलनस्थळावरून केली. तसेच यासाठी त्यांनी लेखी निवेदन देखील दिले. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांची ही मागणी मान्य केली नाही. आंदोलकांना ५ वाजतानंतर आंदोलनस्थळ रिकामे करण्यास पोलिसांनी सांगितले. यानुसार शेकडो आंदोलकांनी जंतर-मंतर परिसरसोडला. मात्र, दिपके काही सहकाऱ्यांसह आंदोलनस्थळी बसून राहिले. 

आंदोलनस्थळी आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरू असतानाच, अभिजीत दिपके यांनी सांगितले की, दिल्ली पोलीस आता जंतर-मंतरवर अन्न आणि पाणी नेण्यास मनाई करत आहेत. महात्मा गांधींनीही उपोषण केले होते आणि हे आंदोलकही उपोषण करतील. पण जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तुमची तुलना जनरल डायरशी केली जाईल. आम्ही दिल्ली पोलिसांना पुन्हा एकदा विनंती करतो की, त्यांनी या परिसरात पाणी आणि अन्न नेण्याची परवानगी द्यावी, असे ते म्हणाले.

टाळी-थाळी वादन आणि 'गो प्रधान गो'च्या घोषणा

आंदोलकांनी टाळ्या-थाळ्या वाजवत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते, त्याची आठवण अभिजीत दिपके यांनी यावेळी करुन दिली. आंदोलकांनी 'गो प्रधान गो'च्या घोषणा दिल्या. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हत्तीखाना ते केंब्रिज: साताऱ्याच्या पर्यावरणतज्ज्ञाला जगातील आघाडीच्या विद्यापीठात पूर्ण शिष्यवृत्ती, हर्षल भोसले यांचे अभिमानास्पद यश
पुढील बातमी
पुसेगावात बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले; तीन महिन्यांत दोनदा सेम मोडस ऑपरेंडी

संबंधित बातम्या