सोलापूर : सैराट फेम सल्या (अरबाज शेख ) याचे वडील सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्याला हॉस्पिटलकडून आलेला अनुभव त्याने इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्या सोलापुरातील रूग्णालयाच्या चौकशीचे आदेश देताच अन्न व औषध विभागाची टीम रूग्णालयात पोहोचली आहे.
दरम्यान, सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांना डोक्याचा आजार झाला आहे. अरबाजने सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र हॉस्पीटलने अनामत रक्कम भरण्यास तगादा लावला, शिवाय रूग्णालयाने दिलेले औषध बाहेरून आणण्यास नकार देत रूग्णालयातील मेडिकलमधूनच खरेदी करण्यास भाग पाडले.
शिवाय सातत्याने पैसे भरण्यास सांगितल्यानं अरबाज शेख हा वैतागला. त्याने सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करीत रूग्णालयाकडून होत असलेल्या त्रासाची रडत रडत माहिती शेअर केली. यासंदर्भातील व्हिडिओ राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत पोहोचला अन् त्यांनी तातडीने रूग्णालयाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. आदेश पोहोचताच तातडीने अन्न व औषध प्रशासनाची टीम रूग्णालयात दाखल झाली असून तपासणी व चौकशी सुरू झाली आहे.