सायगाव : सायगाव ता. जावली येथील ज्येष्ठ व मातृवत व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती शांताबाई दत्तात्रय कदम (वय 86) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
परिसरात त्या ताई या नावाने परिचित होत्या. त्यांनी आपल्या पतींच्या सहकार्याने एकत्रित कुटुंब व्यवस्थेची परंपरा जपत संपूर्ण कुटुंबाला संस्कार, आपुलकी आणि माणुसकीची शिकवण दिली. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेणारी, सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणारी आणि सर्वांना प्रेमाने एकत्र बांधून ठेवणारी आजी म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या मनमिळावू, प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या स्वभावामुळे त्यांनी नातेवाईक व सार्या गोतावळ्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. माणसं जोडणं आणि ती आयुष्यभर जपणं हेच त्यांचं खर्या अर्थाने वैभव होतं. त्यामुळे त्यांच्या जाण्याने केवळ कदम कुटुंबावरच शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम, दैनिक पुढारीचे उपसंपादक संजीव कदम आणि ग्रामपंचायत अधिकारी संदीप कदम यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने प्रेम, संस्कार आणि कुटुंबवत्सलतेचा एक जिवंत आधारवड हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.