संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला श्रीरामनगरीचा भक्तिमय निरोप; फुलांच्या वर्षावात माऊलींचा रथ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

by Team Satara Today | published on : 19 July 2026


फलटण : श्रीरामनगरीने शनिवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला भक्तिमय निरोप दिला. लाखो वारकऱ्यांच्या सहवासात, टाळ-मृदुंगाच्या अखंड गजरात, ‘माऊली... माऊली...’च्या जयघोषात आणि फुलांच्या वर्षावात माऊलींचा रथ आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.

धार्मिक परंपरेने समृद्ध असलेल्या श्रीरामनगरीतील एक दिवसाचा मुक्काम संपवून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी बरडकडे रवाना झाला. शुक्रवारी सायंकाळी पालखीचे आगमन होताच नगरपालिकेच्यावतीने नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व मान्यवरांनी माऊलींचे स्वागत केले. पालखी मार्गावर हजारो भाविक दर्शनासाठी उभे होते. हरिनामाच्या गजरात पालखी पालखीतळावर दाखल होताच संपूर्ण फलटणनगरी भक्‍तिरसात न्हाऊन निघाली. सायंकाळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या संख्येने वारकरी व भाविक सहभागी झाले. 

लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने चालत होते. ‘हुरहुर वाटे जीवास भारी, निघता माऊली सोडुनी आम्हासी...’ या भावनेने भारावलेले फलटणकर अश्रुपूर्ण नजरेने माऊलींच्या रथाकडे पाहत होते. माऊलींचा रथ गिरवी चौक, श्री ज्ञानेश्वर मंदिर, आंबेडकर चौक आणि क्रांतिसिंह नाना पाटील चौक मार्गे बरडकडे रवाना झाला. शहरातील नागरिकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून माऊलींना निरोप दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
२९ धोम धरणग्रस्त गावांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय; २९ गावांतील ग्रामस्थांच्यावतीने मंत्री मकरंद पाटील यांचा सत्कार
पुढील बातमी
स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरातवर विशेष पीएमएलए न्यायालयात तब्बल ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

संबंधित बातम्या