वाई : यशवंतनगर (ता. वाई) येथील शेकडो घरांच्या व मिळकतींच्या नोंदींवर मनमानी पद्धतीने 'अनधिकृत' शेरा मारल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. या कारभाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनासह नोंदी पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी मंगळवार, १५ सप्टेंबरपासून सोनगीरवाडी येथील वाई पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असणारी सुमारे ४०० ते ५०० कुटुंबे नियमितपणे घरपट्टी आणि पाणीपट्टी कराचा भरणा करत आहेत. स्वमालकीच्या इमारती, अपार्टमेंट व भूखंडांसंदर्भातील सर्व आवश्यक परवानग्या आणि वैध कागदपत्रे सादर केलेली असतानाही, ग्रामपंचायतीने आठ-अ उताऱ्यावर 'अनधिकृत' असा शेरा नोंदवल्याने नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांच्या नोंदी करताना दुजाभाव दाखवून वेगवेगळे निकष लावले जात असून, सामान्य नागरिकांना वेठीस धरून प्रशासकीय दबाव निर्माण केला जात असल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
या मनमानी कारभाराविरोधात लहू सावंत, पंढरीनाथ घाटे, गणेश सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी यापूर्वी पंचायत समिती प्रशासनाकडे लेखी निवेदने देऊन दाद मागितली होती; मात्र प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण शंकर सावंत यांच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे आणि मिळकतींवरील बेकायदेशीर शेरे रद्द करून त्या पूर्ववत अधिकृत कराव्यात, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यशवंतनगरमधील मालमत्ता नोंदींवरून वाद पेटला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात आजपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण
by Team Satara Today | published on : 15 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा